स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेला पकडून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर (फोटो सौजन्य-X)
Pune Swargate Bus Depot Crime news marathi: स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचे तपासात समोर आले. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणट गावचा रहिवासी आहे. तसेच त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी जबरी चोरीसह सात गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पकडण्यासाठी पुणेपोलिसांनी आठ पथके तयार केली असून, त्याच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे.
आरोपी दत्ता गाडेला अटक करण्यासाठी पुणे पोलिस नागरिकांची मदत घेत आहेत. आरोपींबद्दल माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहे. त्यामुळे आरोपींना लवकरच अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी कुठल्याही संशयित हालचाली आढळल्यास स्वारगेट पोलीस ठाण्याशी किंवा १०० क्रमांकावर संपर्क साधावा. अशा सूचनाही देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सकाळी साडेपाचच्या सुमारास स्वारगेट एसटी बसस्थानकात आली. ती फलटणला निघाली होती. त्यासाठी बसची वाट पाहात थांबली असताना गाडेने तिला हेरले. त्याने ताई फलटणची बस येथे लागत नाही, पलीक़डे लागते असे तिला सांगितले. मात्र पीडितेने मी नेहमीच येथून बसते असे म्हणत पलीकडे जाण्यास नकार दिला. त्यावर त्याने मी इथे गेली दहा वर्षे काम करत आहे, असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर तिला स्वारगेट – सोलापूर शिवशाही बसजवळ नेले. तिथे गेल्यावर तिने बसमध्ये अंधार असल्याच सांगितले. यावर गाडेने रात्रीची बस असल्याने प्रवासी लाईट बंद करुन झोपले असल्याचे सांगितले. पाहिजे तर मोबाइलची लाइट लावून बघून ये, असे तो म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवत तरुणी बसमध्ये चढली. हीच संधी साधत गाडेने पाठी मागून येऊन पीडितेचा गळा आवळला. यानंतर तिला ठार मारण्याची धमकी दिली आणि लैंगिक अत्याचार केला. या घटनेने तरुणीला मोठा धक्का बसला होता. तिने खाली आल्यावर एक प्रवाशाला गाडेने केलेल्या कृत्याबद्दल माहिती दिली. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर तरुणी काही वेळाने आलेल्या फलटणच्या बसमध्ये बसून निघून गेली.
दरम्यान, प्रवासात अस्वस्थ वाटत असतानाच तिने मित्राला फोन करून घटनेची माहिती दिली.मित्राने धीर दिल्यावर ती सातारा येथून पुन्हा माघारी फिरून स्वारगेटला आली. तेथे येऊन सकाळी नऊच्या सुमारास तिने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. सध्या पीडित तरुणी ससून रुग्णालयात ॲडमिट असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, गाडेच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.