खासदार सुप्रिया सुळे (फोटो- सोशल मिडिया)
Pune Crime News: पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. स्वारगेट बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. नराधम फरार असून पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर आहेत. दरम्यान आता या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पीडित तरुणी ही फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकावर आली होती. मात्र पहाटेच्या साडे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. दत्तात्रय रामदास गाडे या व्यक्तीने तरुणीला फसवून आगारातील अंधारातील शिवशाही बसमध्ये बसवले. त्यानंतर बसचा दरवाजा लावून घेत तरुणीवर अत्याचार केला. नराधमावर यापूर्वी देखील गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मध्यवर्ती भागातील गजबजलेल्या भागामध्ये असा प्रकार घडल्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
अतिशय संतापजनक! स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी आहे.
https://twitter.com/supriya_sule/status/1894672335782748624
या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यांवर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे . यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे.
स्वारगेट बसस्थानकावर झालेल्या अत्याचार प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चाकणकर म्हणाल्या की, स्वारगेट बसस्थानक परिसरामध्ये घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला असून सकाळी 9 पर्यंत तरुणीने स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस पूर्ण प्रयत्नांनी तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज पाहिले जात आहेत.
Pune Crime News : पुणे हादरलं! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार
आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली असून पुणे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ही घटना घडली त्यावेळेस पोलिसांचं पेट्रोलिंग सुरु होतं. अनोळखी व्यक्तींशी संवाद करणे टाळावे. मास्क घालून आलेल्या या व्यक्तीने पीडित तरुणीकडे तिला कुठे जायचं आहे याची चौकशी केली. त्यानंतर आरोपी मुलीला घेऊन गाडीपर्यंत गेला आहे. त्यामुळे महिलांनी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. आरोपीला अटक होऊन पूर्ण कारवाई केली जाईल, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे.