
ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, पोलीसाचाही सहभाग; कोट्यवधीचा मुद्देमाल सापडला
पोलिस हवालदार शामसुंदर विश्वनाथ गुजर (वय ३९, रा. नेप्ती, ता. अहिल्यानगर) याच्यासह शादाब रियाज शेख (वय ४१, रा. डंबेनाला शिरुर ता. शिरुर), ज्ञानदेव उर्फ माऊली बाळू शिंदे (वय ३६ रा. कोहकडी ता. पारनेर जि. अहिल्यानगर), महेश दादाभाऊ गायकवाड (वय २७, रा. हिंगणी ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) व ऋषिकेश प्रकाश चित्तर (वय ३५, रा. कुरुंद ता. पारनेर जि. अहिल्यानगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
शिरूर शहरात ड्रग्ज रॅकेट सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस आधीक्षक संदिप सिंह गिल्ल यांनी विशेष पथक तयार करून शिरूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्यानंतर शिरूरमधील गॅरेज चालक असलेल्या शादाब शेख (वय ४१, रा. डंबेनाला शिरुर ता. शिरुर) याला ताब्यात घेत त्याच्याकडे तपास करण्यात आला. तेव्हा त्याच्याकडून १ किलो मेफेड्रोन हे ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या अधिक तपासातात ड्रग्ज पुरवणाऱ्या ज्ञानदेव उर्फ माऊली शिंदे व महेश गायकवाड तसेच ऋषिकेश चित्तर यांची नावे पुढे आली आणि त्यांना पकडण्यात आले. चौकशीतून त्यांच्याकडून तब्बल साडे नऊ किलो आणखी मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
या प्रकरणाचा सखोल तपास करीत असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात नेमणूकीस असलेल्या पोलिस हवलदार शामसुंदर गुजर याचा या ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग समोर आला. त्यानंतर मध्यरात्री त्यालाही पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचे समजते. तो या ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचीही माहिती समोर येते आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पंडित मांजरे, पोलिस हवालदार निलेश शिंदे, जनार्दन शेळके, तुषार पंधारे, राजू मोमीन, संजय जाधव, तसेच पोलिस शिपाई पोपट गायकवाड, शिरूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलिस शिपाई अंबादास थोरे, सचिन भोई यांच्या पथकाने केली आहे.
व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड सापडले
ड्रग्ज रॅकेट मधील महत्वाचा सूत्रधार हा पोलिस हवालदार शामसुंदर गुजर असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, या रॅकेटमधील काही आरोपींची व्हॉट्सअप कॉलवर तो संपर्कात होता. त्यातील काही आरोपींनी त्याचे व्हॉट्सअप कॉलही रेकॉर्ड केले असल्याचे समोर आले आहे. हे रेकॉर्डिंगच पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : कपडे पिळून वाळत घाल म्हटल्यावर झाला राडा; लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण
ड्रग्जचे आंतरराज्य रॅकेट!
शिरुर तालुक्यात रांजणगाव एमआयडीसीतून उच्च दर्जाचे मेफेड्रोन बनविले जात असल्याचे गेल्या वर्षी समोर आले होते. यानंतर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले होते. याप्रकरणातील प्रमुख आरोपी देशाबाहेर पळून गेला. तो अद्याप पुणे पोलिसांना सापडलेला नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाचा आता आणखी एक प्रकार ग्रामीण भागातून समोर आला असल्याचे पुण्यासह ग्रामीण भागात देखील ड्रग्ज रॅकेट सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हे रॅकेट देशभरात पसरल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. रॅकेटमधील ‘पुढची लिंक’ही समोर आली असून, पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.