सौजन्य - नवराष्ट्र टीम
वडगाव मावळ| सतिश गाडे : लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत ८ किलो ५०० ग्रॅम गांजा तसेच एक कार असा एकूण ७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गांजा विक्रीसाठी आणला होता की अन्य कोणत्या उद्देशाने जवळ बाळगला होता, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शुभम रमाकांत शर्मा (वय २३, रा. श्रमदान नगर, कुसगाव बुद्रुक, ता. मावळ, जि. पुणे) हा कुसगाव बुद्रुक येथील आयआरबी कार्यालय परिसरात कारमधून गांजा विक्री करीत आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. त्यानंतर संशयित व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याची तसेच त्याच्या ताब्यातील हुंडाई आय-१० कार (क्र. MH 14 BK 7235) ची झडती घेतली असता कारमध्ये गांजा आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी ४ लाख २५ हजार रुपये किमतीचा ८ किलो ५०० ग्रॅम गांजा आणि ३ लाख रुपये किमतीची हुंडाई आय-१० कार, असा एकूण ७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ आणि मन:प्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित सावंत, म्हेत्रे, पोलीस हवालदार गणेश होळकर, संतोष शेळके, तुषार भोईटे, सागर नामदास, राजू मोमीन, सिद्धेश पाटील, पुष्पा घुगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल वाडेकर यांनी सहभाग घेतला.






