
Accident News: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कारची ट्रकला जोरदार धडक , २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिनाक सूर्यवंशी हे कारमधून साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने एकटेच प्रवास करत होते. किकवी गावाच्या हद्दीत आल्यानंतर त्यांच्या कारची पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात पिनाक यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पथक तसेच महामार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून आवश्यक कार्यवाही केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, अपघातामुळे साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. चालकाला डुलकी लागली होती की वाहनावरील नियंत्रण सुटले, याबाबतही निश्चित माहिती समोर आलेली नाही. राजगड पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत असून, पंचनामा आणि इतर तपासानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.