
Pune Crime: पुण्यात शेल कंपन्यांच्या माध्यमातून ४,४२७ कोटी परदेशात; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा
पुणे : शेल कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल ४,४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपये परदेशात पाठवून केंद्र सरकारचा आयकर चुकवल्याचा कथित गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुण्यातील दोन चार्टर्ड अकाउंटंट्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे आणि ऑडिट अहवालांचा वापर करून हा कथित गैरव्यवहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश कुमार सुरेशचंद बगरेचा (३४, रा. आचलनगर, कोंढवा) आणि मोहित शिवकुमार तोडी (३३, रा. कोंढवा बुद्रुक) या दोन चार्टर्ड अकाउंटंट्सविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निगडी प्राधिकरणातील रहिवासी तन्मयी सुहास देसाई यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे.
हेही वाचा: Crime News: यूएईत भारतीयाची निर्घृण हत्या; मृतदेहाचे नऊ तुकडे करून बॅगमध्ये भरले अन्…
देसाई यांच्या तक्रारीनुसार, आरोपी अंकुश बगरेचा आणि मोहित तोडी यांनी त्यांच्या ‘एम.एस.ओडी अँड असोसिएट्स’ या फर्मच्या माध्यमातून इतर साथीदारांच्या मदतीने हा प्रकार केल्याचा आरोप आहे. शेल कंपन्यांच्या व्यवहारांशी संबंधित मूळ व अधिकृत कागदपत्रे सादर न करता किंवा त्यांची योग्य तपासणी न करता परदेशात पैसे पाठवण्यासाठी आवश्यक असलेल्या फॉर्म १५ सीबीचे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही प्रमाणपत्रे खरी असल्याचे भासवून आयकर विभागासमोर सादर करण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, २०२२ ते २०२६ या कालावधीत संबंधित तीन शेल कंपन्यांच्या माध्यमातून एकूण ४,४२७ कोटी ९२ लाख ४४ हजार ४०८ रुपये परदेशात पाठवण्यात आले. या प्रचंड रकमेवर केंद्र सरकारला मिळणारा कर चुकवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फॉर्म १५ सीबी तयार करण्याचा अधिकार नसतानाही आरोपींनी तो तयार करून आयकर विभागाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड केल्याचा आरोप आहे. या बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन कंपन्यांना मोठा आर्थिक फायदा मिळवून दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. परदेशात पाठवण्यात आलेल्या रकमेचा मूळ स्रोत काय होता, कोणती बँक खाती वापरण्यात आली, पैसा कोणत्या देशांमध्ये पाठवण्यात आला आणि संबंधित तीन कंपन्यांच्या संचालकांची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास केला जात आहे.
भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.