
रिक्षाचा धक्का लागला अन् थेट खड्ड्यात पडले! पुण्यात 55 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर रोजी येरवडा येथील मच्छी मार्केट परिसरात ही दुर्घटना घडली. महापालिकेच्या ड्रेनेजच्या कामासाठी येथे खड्डा खोदण्यात आला होता. दरम्यान, रिक्षाचा धक्का लागल्याने प्रदीप परदेशी हे खड्ड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ड्रेनेजच्या कामासाठी खोदण्यात आलेला खड्डा सुमारे १० ते १५ फूट खोल होता. खड्ड्याभोवती सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, असा आरोप नागरिकांनी केला आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी योग्य बॅरिकेडिंग, सूचना फलक आणि इतर सुरक्षाव्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र, या ठिकाणी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली गेली होती का, असा प्रश्न दुर्घटनेनंतर उपस्थित केला जात आहे. या परिसरात यापूर्वीही अशा प्रकारचे अपघात झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबईत मेनहोलचे झाकण नसल्यामुळे खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर संबंधित कामातील सुरक्षितता आणि जबाबदारीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. आता पुण्यातील येरवडा परिसरातही ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून व्यक्तीचा मृत्यू झाल्याने सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या कामांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
या दुर्घटनेनंतर मृत प्रदीप परदेशी यांच्या नातेवाइकांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेला जबाबदार कोण, तसेच कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नव्हत्या, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दुर्घटनेची नेमकी परिस्थिती, सुरक्षाव्यवस्थेची स्थिती आणि संभाव्य जबाबदारी याबाबत तपासातून पुढील माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.