पुणे महापालिकेतील भरती गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी राजेंद्र खेडेकरला दणका; कोर्टाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी (संग्रहित फोटो)
पुणे : पुणे महापालिकेत विविध पदांवर नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी डॉ. राजेंद्र खेडेकरला शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (दि.29) अटक केली. न्यायालयाने त्याला तीन ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या कथित भरती गैरव्यवहार प्रकरणात सहभागी आरोपींनी चौदाहून अधिक व्यक्तींना बनावट नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्याकडून जवळपास पावणेतीन कोटींहून अधिक रक्कम लाटल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी जेजुरी येथील मार्तंड देवस्थानचा विश्वस्त राजेंद्र बबनराव खेडेकर याच्यासह महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद बाळासाहेब पाटील आणि अन्य आरोपींविरोधात शिवाजीनगर आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत, महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अक्षीक्षकांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार मे २०२२ ते मे २०२५ या कालावधीत महापालिकेच्या परिसरासह इतर ठिकाणी घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आरोपींनी बेरोजगारांना पालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.
आरोपींनी आपसांत संगनमत करून महापालिकेचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर करून बोगस नियुक्तीपत्रे तयार केली. त्यांनी उमेदवारांना बनावट नियुक्तीपत्रे, ओळखपत्रे, सेवा पुस्तिका, वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि पगाराच्या पावत्याही दिल्या; इतकेच नव्हे तर उमेदवारांचा विश्वास बसावा यासाठी त्यांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्याचे दाखविले, असे तक्रारींमध्ये नमूद आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडेकर पसार
याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर खेडेकर पसार झाला होता. त्याने अटकपूर्व जामीनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. नोकर भरतीचा सुनियोजित घोटाळा हा मोठ्या संघटित टाचा भाग असून, त्यामुळे सरकारी भरती प्रक्रियेवरचा सर्वसामान्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे; तसेच अनेक बेरोजगार व्यक्तींचे आर्थिक नुकसान झाले आहे.
गुन्ह्याची व्याप्ती पाहता कोर्टाकडून पोलिस कोठडी
आरोपांचे स्वरूप व गांभीर्य, आरोपींचा प्राथमिक सहभाग व भूमिका, तपासाची सद्यःस्थिती आणि व्याप्ती व आरोपीच्या पोलिस कोठडीतील चौकशीची आवश्यकता लक्षात घेता आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही, असे न्यायालयाने आदेशात म्हटले होते. या गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती लक्षात घेता न्यायालयाने आरोपी खेडेकरला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी दिली.
Beed Crime News : जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा






