crime (फोटो सौजन्य : social media)
अमरावती शहर पोलीस दलातून तीन वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या एका पोलीस जमादाराने टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. दुपारी घरी कोणी नसतांना त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या निवृत्त जमादाराचे नाव राजेश शंकरराव पाटील असे आहे. त्यांच्या घरी एक चिठ्ठी सापडली आहे. त्यांनी आपल्या दीर्घकालीन आजाराला कंटाळून जीवन संपवल्याचा पप्राथमिक अंदाज राजापेठ पोलिसांनी व्यक्त केला आहे.
राजेश शंकरराव पाटील हे २०२२ मध्ये अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यातून जमादार पदावरून सेवानिवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर ते अमरावतीतच वास्तव्यास होते.मंगळवारी दुपारी, घरात कोणीही नसतांना, दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. यावेळी त्यांना राजेश पाटील यांनी लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली.
चिठ्ठीत काय?
त्यांना मागील काही वर्षांपासून मधुमेहाचा आजार होता आणि किडनीचाही त्रास जडला होता. या गंभीर आणि दीर्घकाळ चाललेल्या आजारपणामुळे त्यांच्या शरीरावर मोठा परिणाम झाला होता. त्यांचा जवळपास २० किलो वजन या आजारामुळे कमी झाले होते. आजारामुळे आपलं जगणं असह्य झालं आहे आणि त्यामुळेच आपण हा निर्णय घेत आहोत, असे चिठ्ठीत नमूद केले होते.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. एका निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने आजारपणाला कंटाळून असे टोकाचे पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
प्रेमविवाह करण्यास दिला घरच्यांनी नकार, प्रेमी युगुलाने रिक्षामध्ये संपवले जीवन