सेवानिवृत्त प्राध्यापकाला एक कोटीला गंडवले; पोलिस अधिकारी असल्याची खोटी माहिती दिली अन्...
परभणी : सायबर भामट्यांनी आपण दिल्लीचे पोलिस अधिकारी असल्याची खोटी बतावणी करून परभणीतील सेवानिवृत्त प्राध्यापक दाम्पत्याला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याची भीती दाखवून १ कोटी ११ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ६ ऑगस्ट रोजी शहरातील नवा मोंढा पोलिस ठाण्यात पाच ते सहा अनोळखी लोकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
परभणी शहरातील समाधाननगर भागातील रहिवासी असलेले सेवानिवृत्त प्राध्यापक भीमराव सोमाजी बडोले यांना १६ जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी व्हॉटसअॅपवर व्हिडिओ कॉल करून आम्ही दिल्ली पोलिस, एन. आय. ए. व एटीएसमधून बोलत असल्याचे सांगून तुमच्या आधार कार्डच्या आधारे दहशतवाद्यांनी आयसीआयसीआय बँकेचे खाते काढले आहे.
सहा सायबर भामट्यांवर गुन्हा
याप्रकरणी सेवानिववृत्त प्राध्यापक भीमराव सोमाजी बडोले यांच्या फिर्यादीवरून पाच ते सहा अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विश्वजित कासले यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सायबर शाखेचे पोलिस निरीक्षक सुकाळे हे करत आहेत.
जेलमध्ये जाण्याची दाखवली भीती
त्यावर दहशतवादी कृत्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याने केस नोंद असल्याचे सांगून आर्थिक व्यवहारामुळे मनीलॉड्रिंगची केस झाली असल्याची बतावणी केली. चौकशीमध्ये सहकार्य न केल्यास जेलमध्ये जाल, अशी धमकी त्यांना देऊन तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सिम्बॉलचा, नावाचा उपयोग करून डेप्युटी गव्हर्नर यांची सही असलेले बनावटपत्र पाठवुन वेगवगेळ्या चार खात्यावर मिळून एकून १ कोटी ११ हजार रूपये भरायला सांगितले. तसेच त्या रक्कमेबाबत पडताळणी झाल्यानंतर परत करू, असे सांगून परत न देता त्या दाम्पत्याची आर्थिक फसवणूक केली.
आयटी इंजिनिअर तरुणीने गमावले सव्वा दोन कोटी
उच्चभ्रू व्यक्तींना सायबर चोरटे टार्गेट करत असून, एका आयटी अभियंता तरुणीला शेअर मार्केटमधील गुंतवणूकीच्या आमिषाने तब्बल सव्वा दोन कोटींना गंडा घातला आहे. सायबर चोरट्यांनी अवघ्या दीड महिन्यात या तरुणीकडून सव्वा दोन कोटी उकळले आहेत. पोलिस देखील याप्रकारानंतर शॉक झाले आहेत. दुसरीकडे सायबर गुन्हे दिवसागणिक वाढत असून, त्यात शिक्षीत तसेच ज्येष्ठ नागरिकांची सर्वाधिक फसवणूक होत असल्याचे निरीक्षण आहे.






