
सिया-चेतनचा 4 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह; दोघांनीही कुटुंबियांना ठेवले होते अंधारात
पुणे : व्यावसायिक केतन अग्रवालच्या लोहगडावरील हत्येची मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी ४ महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केले होते, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. दोघांनी घरच्यांना अंधारात ठेवून हे लग्न उरकल्याचा दावाही करण्यात आला असून, केतनच्या खूनासाठी दोघांनी अनेक वेबसीरिज, पॉडकास्ट आणि देशातील वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती घेतल्याचेही समोर आले आहे. दोघांच्या विवाहाची माहिती समोर आल्यानंतर पोलिसही आवक झाले होते, असे सूत्रांनी सांगितले.
लोहगडावरून ढकलून देऊन १८ जून रोजी केतनची वाग्दत्त वधू सिया व तिचा बॉयफ्रेंड चेतन यांनी हत्या केली. दोघांच्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांच्यातील संभाषण, चॅटिंगमधून धक्कादायक माहिती हाती लागत आहे. आरोपींच्या मोबाईलमधील ६-७ महिन्यांपासूनच्या चॅटिंगची पोलिसांनी पडताळणी केली.
दरम्यान, याप्रकरणात डिजिटल पुरावे, मोबाईल चॅट, कॉल नरेकॉर्ड, लोकेशन व इतर तांत्रिक बाबींची तपास यंत्रणेकडून पडताळणी सुरू आहे. तपास निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आणखी काही महत्त्वाचे पुरावे समोर येण्याची शक्यता असून, चॅटिंग तसेच सियाने ६ महिन्यांत सर्च केलेल्या गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातून काही धक्कादायक माहिती हाती लागली आहे.
क्राईम सीरीज पाहून रचला हत्येचा कट?
पॉडकास्ट, व्हिडिओ आणि वेबसिरीज पाहून गुन्हा कसा करावा, याचा सिया व चेतनने माहिती घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे. देशभरात घडलेल्या खुनांच्या घटनांचा अभ्यास करून कोणत्या पद्धतीने गुन्हा केल्यास संशय कमी येईल, याची खातरजमा दोघांनी केली. चाकू किंवा शस्त्र वापरल्यास पुरावे सहज मिळू शकतात व पकडले जाण्याची शक्यता वाढते, असा त्यांचा निष्कर्ष होता. या वस्तू घेण्यासाठी कुठे तरी जावे लागेल, त्या सांभाळाव्या लागतील अथवा घटनेनंतर लपवून ठेवाव्या लागतील. त्यामुळे शस्त्र न वापरता कड्यावरून ढकलून देण्याचा निर्णय घेतल्याचे सियाने चौकशीत सांगितल्याचा पोलिसांचा दावा आहे.
डेअरिंग होत नाही; सियाने चेतनला नेले
केतनला मारण्यासाठी सिया त्याला घेऊन १४ जून रोजी लोहगडावर गेली. त्यादिवशी तिने प्रयत्नही केला. पण, घाबरली आणि तिचा डाव फसला. नंतर सियाने चेतनला माझे डेअरिंग होत नाही. तू पण चल. दोघे मिळून ढकलून देऊ, असे म्हणत त्याला लोहगडावर नेले, अशीही माहिती आहे. घटनेच्या दिवशी दोघांनी मिळून केतनला ढकलून दिले. घटनेनंतर दोघांनीही हा प्रकार अपघात असल्याचा आभास निर्माण केला.