सौजन्य फोटो - सोशल मिडीया
Crime News: कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोविलजवळील धम्मधु कोनम परिसरातील व्हीआयपी गार्डनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मधुमिता पती विनोदकुमार आणि मुलासोबत राहते. मधुमिता नियमितपणे दागिने परिधान करून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत होती. ती दर महिन्याला सोने खरेदी करत असल्याचेही व्हिडिओमधून सांगत असे. त्यामुळे तिच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने असल्याची माहिती अनेकांना होती. काही दिवसांपूर्वी मधुमिता खरेदीसाठी बाहेर गेली होती. परतण्यास उशीर झाल्याने चोरट्यांनी संधी साधत घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घरी परतल्यानंतर मधुमिता तिच्या गुप्त खोलीत गेली असता तेथील सोन्याचे दागिने गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. चोरट्यांनी सुमारे ११८ ते १२० सॉव्हरिन म्हणजेच अंदाजे ९४४ ते ९६० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच काही रोख रक्कम लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे. चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत सुमारे एक कोटी रुपये असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे. मधुमिताने याबाबत राजाकमंगलम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला असून, प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकही नेमण्यात आले आहे.
मधुमिता सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये तिच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची माहिती देत असे. तिच्याकडे सोन्याच्या चार थाळ्या असल्याचे, तसेच १५ पाउंडची सोन्याची चेन आणि सुमारे ४० पाउंडची आणखी एक सोन्याची थाळी असल्याचे तिने एका व्हिडिओत सांगितल्याचे वृत्त आहे. ‘मी दर महिन्याला सोने खरेदी करते, तुम्हीही करा,’ असे आवाहनही ती फॉलोअर्सना करत असे.
This Youtuber from KanyaKumari showed off her money & jewelry in the vlog. Thieves broke the house & stole 1 Cr. worth of jewelry.pic.twitter.com/WEebM03dkZ — Vije (@vijeshetty) September 25, 2026
या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून घरातील दागिन्यांची माहिती मिळवली का, ती सोने खरेदीसाठी कधी बाहेर पडते याची पाहणी केली का, याचा तपास पोलिस करीत आहेत. राजाकमंगलम पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल रेकॉर्ड तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती, घरातील मौल्यवान वस्तू, बाहेर जाण्याची वेळ किंवा दागिन्यांचे तपशील सार्वजनिक करताना सावधगिरी बाळगण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.






