
karmala death threat
करमाळा प्रतिनिधी : करमाळा तालुक्यात फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पुणे येथील सौरभ उर्फ राणा सूर्यवंशी याच्याविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या भावाला कायमचे संपवून टाकण्याची, शिक्षण संस्थेला कुलूप लावण्याची तसेच मुलांच्या व्यवसायात आणि शिक्षणात अडथळे निर्माण करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील नवनाथ मधुकर झोळ (वय ५३) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सौरभ उर्फ राणा सूर्यवंशी (रा. अमनोरा सिटी, हडपसर, पुणे) याने १२ ऑगस्ट आणि १३ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांच्या मोबाईलवर फोन करून शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप आहे. (Solapur News)
तक्रारीत नमूद केल्यानुसार, फोनवरून तक्रारदाराचे भाऊ रामदास झोळ यांना कायमचे संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली. तसेच संबंधित शिक्षण संस्थेला कुलूप लावण्याचा इशाराही दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
याशिवाय तक्रारदाराचा मुलगा हर्षवर्धन याच्या केळी व्यवसायात अडथळे निर्माण करण्याची तसेच त्याच्या केळीच्या बागेत अमली पदार्थ ठेवून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारदाराचा दुसरा मुलगा दर्शन हा बंगळुरू येथे वैद्यकीय शिक्षण घेत असून त्यालाही पाहून घेण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी करमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१(२) आणि ३५२ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच पुढील प्रतिबंधात्मक कारवाईसाठी हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे पोलीस नोंदीत नमूद आहे. फोनवरून देण्यात आलेल्या कथित धमक्यांमुळे या प्रकरणाची करमाळा तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासण्याची प्रक्रिया आणि पुढील पोलीस कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.
रूपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट! तीन आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला