Photo Credit- Social Media तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडची 'ती' ऑडिओ क्लिप व्हायरल
बीड: बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असला तरी दिवसेंदिवस वाल्मिक कराडचे एक एक कारनामे समोर येत आहेत. अशातच आता वाल्मीक कराडची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये कराड आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा संवाद ऐकायला मिळतो. या क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या संभाषणात कराडने “मी बीड जिल्ह्याचा बाप, मी असल्यावर काय चिंता” असे विधान केले आहे. या क्लिपमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. सध्या पोलीस अधिकाऱ्यांकडून या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासली जात आहे. सायबर विभागाच्या महिला पोलीस अधिकारी निशिगंधा खुळे यांच्याशी कराडचा संवाद असल्याचे क्लिपमध्ये ऐकायला मिळते. या संभाषणात, एका कार्यकर्त्याच्या प्रकरणावरून वाल्मिक कराडने हस्तक्षेप करत, “किरकोळ गुन्हा आहे, द्या सोडून” असे सांगितल्याचे आढळते.
Suresh Dhas: “करूणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तूल…”; सुरेश धसांचा बीड पोलिसांवर गंभीर
तसेच, संभाषणात कराडने कार्यकर्त्यांना उद्देशून, “लई मनावर घ्यायचं नाही, इथे बाप बसलेले आहेत आपण,” असे विधान केल्याचे ऐकायला मिळते. निशिगंधा खुळे या पूर्वी सायबर सेलमध्ये कार्यरत होत्या, मात्र सध्या त्यांची बदली गेवराई येथे झाली आहे.
या व्हायरल कथित ऑडिओ क्लिपमुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांवर दबाव टाकून प्रकरणे मिटवण्याचा प्रयत्न किंवा स्वतःला प्रभावशाली ठरवून दहशत निर्माण करण्याचा आरोप या क्लिपमुळे समोर येतो. पोलीस खात्याने ऑडिओ क्लिप सत्यता तपासणीसाठी ताब्यात घेतली आहे. व्हायरल क्लिपमुळे जिल्ह्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाल्मिक कराड सध्या मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) गुन्ह्यांतर्गत एसआयटीच्या (विशेष तपास पथक) कोठडीत आहे. गेल्या आठवड्यात तब्येत बिघडल्याने त्याच्यावर शासकीय रुग्णालयात दोन दिवस उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला डिस्चार्ज देऊन पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले. दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेचा शोध पोलीस अद्याप घेत आहेत. मात्र, तो फरार असल्याने या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संभाषण:
कार्यकर्ता: अण्णा, नाशिकवरून बोलतोय. परत फोन येत आहेत पोलीस स्टेशनवरून.
वाल्मिक कराड: चला, ठेवा.
वाल्मिक कराड: निशिगंधा खुळे, ताई, वाल्मिक कराड बोलतोय.
वाल्मिक कराड: ती पोरं चिल्लर आहेत बरं, ते काय करणार आहेत तिकडे.
पीएसआय कुलथे: पोस्ट डिलीट करून टाका, झालं.
वाल्मिक कराड: भय्या, पोस्ट डिलीट करून टाका.
पीएसआय कुलथे: वातावरण खराब होतं.
वाल्मिक कराड: त्यांनी विषय सुरू केला.
वाल्मिक कार्यकर्त्यांना उद्देशून: इग्नोर करायचं भाई, मनावर घ्यायचं नाही. इथे बाप बसलेले आहेत आपण.
कार्यकर्ते: तुम्ही आहेत म्हणूनच दम धरलाय.
(नवराष्ट्र या ऑडिओ क्लीपची पुष्टी करत नाही)