
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून; पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून पकडले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने पत्नी निलाबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यातून त्याने धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर वार करून तिचा खून केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. याबाबत बावधन पोलिसांकडून तपास सुरू होता. आरोपीने खून करताना वापरलेले धारदार शस्त्र घटनास्थळावरून पळून जाताना कोठेतरी लपवून ठेवले असल्याने त्याचा तत्काळ शोध लागत नव्हता. या गंभीर गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा मोबाइल क्रमांक व तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्यातून आरोपी कर्नाटकात गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर तात्काळ तपास पथकांकडून दोन टीम तयार करून त्यांना कर्नाटकात रवाना करण्यात आले. पोलिसांनी आरोपीचा माग काढत विजापूर, कर्नाटक येथे शोध घेतला. तेथे आरोपी शेतात लपून बसल्याचे पोलिसांना आढळून आले. स्थानिक पोलिस व नागरिकांच्या मदतीने बावधन पोलिसांच्या पथकाने आरोपी परशुराम भामण्णा हरिजन याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करण्यात आली.
हे सुद्धा वाचा : दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस सहआयुक्त सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त-गुन्हे बसवराज तेली, अपर पोलिस आयुक्त-प्रादेशिक विभाग प्रदीप जाधव, पोलिस उपायुक्त परिमंडळ-२ विठ्ठल कुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, पोलिस निरीक्षक परवेज शिकलगार, पोलिस निरीक्षक-गुन्हे चेतन थोरबोले, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.