
ओवेसींना खंडपीठाचा दणका, दाखल गुन्हा रद्द करण्यास नकार; नेमकं प्रकरण काय?
नांदेड : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अर्धापूर पोलिसांत दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळून लावली आहे. गुन्हा तसेच कनिष्ठ न्यायालयातील पुढील कार्यवाही रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिल्याने अर्धापूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातील खटला सुरूच राहणार आहे. डिसेंबर २०११ मध्ये नांदेड येथे झालेल्या सभेतील भाषणावरून २०१३ मध्ये अर्धापूर पोलिसांनी ओवेसी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २९५-अ आणि २९८नुसार गुन्हा दाखल केला होता.
व्हिडिओ पुराव्यांची सुनावणीत तपासणी
ही फौजदारी कार्यवाही रद्द करण्यासाठी ओवेसी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ओवेसी यांच्या वतीने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४६८चा आधार घेत दखल घेण्याची मुदत संपल्यानंतर कार्यवाही सुरू करण्यात आल्याचा युक्तिवाद करण्यात आला. तसेच भाषणामागे धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचेही सांगण्यात आले. राज्याच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रश्मी गौर यांनी याचिकेला विरोध केला. भाषणाचा संदर्भ, कथित हेतू आणि उपलब्ध व्हिडिओ पुरावे यांची सविस्तर तपासणी खटल्याच्या सुनावणीदरम्यानच होणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत कनिष्ठ न्यायालयातील कार्यवाहीत हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
२०११च्या भाषणावरून २०१३मध्ये गुन्हा
नांदेडमधील २०११ च्या भाषणावरून २०१३मध्ये अर्धापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची पुढील न्यायालयीन प्रक्रिया अर्धापूरच्या जेएमएफसी न्यायालयात सुरू असून, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ती पुढे सुरू राहणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री बांदल यांच्यावरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट
शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखवीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ हल्ला झाला होता. सुखबीर सिंह बादल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर बादल या देखील होत्या. सुखवीर सिंह बादल यांच्यावर हल्ला केल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणी नांदेडच्या मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला करणाऱ्या जसपाल सिंग याच्या पुण्यातील निवासस्थानावर जाऊन पुणे पोलिस व दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी माहिती घेतली. पूलगेट परिसरातील त्याच्या घरासह वकिलीच्या कार्यालयाचीही माहिती घेतली, असल्याचे सांगण्यात आले आहे. बादल यांच्यावर गुरुवारी दुपारी नांदेड येथे हल्ला झाला. हा हल्ला मूळचा पुण्यातील असलेला जसपाल सिंग याने केल्याचे समोर आले. त्याला अटक देखील केली आहे.