
घरफोडीचा तपास करताना पोलिसांवर जीवघेणा हल्ला, कर्मचाऱ्याच्या डोक्यात घातला दगड; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
रवि मिसाळ, यश मिसाळ आणि त्यांचे दोन साथीदार अशी पोलिस पथकावर हल्ला चढविणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात कैलास प्रेमसिंग राठोड (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. राठोड हे फुलंब्री पोलिस ठाण्यात हवालदार आहेत. ११ नोव्हेंबर रोजी ११ वाजेच्या सुमारास पोखरी शिवारात चोरी संबंधी डायल ११२ वर कॉल आला होता. शिवारात समाधान तुपे, प्रवीण फुलाने आणि प्रीतम बोंगाडे यांच्या घरात घरफोडी झाली होती. चोरट्यांनी घरातील सोने, रोख रक्कम तसेच प्रीतम बोंगाडे यांची मोपेड (एमएच-२०-डीए-७०८८) चोरून नेली होती. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस घटनास्थळी गेले.
तिथे गेल्यानंतर पोलिसांनी आपली ओळख सांगून ओळखपत्रही दाखविले. मात्र, त्यानंतरही मिसाळ बंधूंनी सुनील सोनवणे यांची गच्ची पकडून मारहाण सुरू केली. त्यातील एकाने फोन करून साथीदारांना बोलावून घेतले. काही वेळातच दोन तरुण तेथे आले. त्यांनी रवी मिसाळ याला धक्का कोणी दिला, अशी विचारणा केली. मिसाळ यांनी सोनवणे यांच्याकडे बोट दाखवताच एकाने आज तुला सोडणार नाही, जिवे मारून टाकू अशी धमकी देत त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर सोनवणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. इतर हल्लेखोरांनी राठोड आणि नागलोद यांनाही मारहाण केली.
हे सुद्धा वाचा : क्रीडाविश्वात खळबळ! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला खेळाडूची आत्महत्या
हे पोलिस आहेत, यांना आज जिवे मारून टाकू, असे म्हणत हल्लेखोरांनी पुन्हा पोलिसांना मारहाण केली. याचवेळी एका तरुणाने सोनवणे यांच्याकडील कारची चावी हिसकावून घेतली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी धाव घेत पोलिसांची हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका केली. शुभम सुनील ससाणे आणि शफीक युनिसखान पठाण यांनी जखमी पोलिसांना मदत केली. गंभीर जखमी सोनवणे यांना प्रथम चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक सचिन वायाळ करित आहेत.
Ans: ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमधील मिसारवाडी येथील अण्णाभाऊ साठे चौकाजवळ पोलिस पथकावर हल्ला झाला.
Ans: रवि मिसाळ, यश मिसाळ आणि त्यांचे दोन साथीदार अशी आरोपींची नावे आहेत.
Ans: सुनील सोनवणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.