
जमिनीच्या वादातून भावानेच केला भावाचा खून; न्यायालयाने आरोपीला सुनावली 'ही' मोठी शिक्षा
राहुल बाचलकर आणि सतिश बाचलकर हे दोघे सख्खे भाऊ आहेत. मादणी बोरगाव येथील शेतीच्या वाटणीवरून त्यांच्यात जुना वाद सुरू होता. या शेतीच्या वाटणीचा तिढा सोडवण्यासाठी १६ मे २०२२ रोजी दोघे भाऊ आणि त्यांचे नातेवाईक मादणी येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी १७ रोजी सकाळच्या सुमारास राहुल व त्याची पत्नी रिता आणि त्याची दोन्ही मुले आपल्या काही वैयक्तिक वस्तू मागण्यासाठी सतिशच्या घरी गेले होते. यादरम्यान राहुलची आई घराबाहेर आली आणि ती वाद घालू लागली. वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या सतिशने घरातून अचानक चाकू आणून राहुलच्या पाठीवर वार केला. यात तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले.
हे सुद्धा वाचा : जमीन व्यवहारात डॉक्टरची फसवणूक; माजी नगरसेवकासह चौघांवर मोक्का कारवाई
परिस्थितीजन्य पुराव्यांवरून सुनावली जन्मठेप
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक शशीकिरण नावकर यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. शुक्रवारी याप्रकरणाची सुनावणी घेण्यात आली. यात सरकारी पक्षाच्या वतीने १० साक्षीदार तपासण्यात आले. याप्रकरणात न्यायालयाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपीला जन्मठेप आणि २ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. मंगेश एस. गंगलवार यांनी बाजू मांडली.
हे सुद्धा वाचा : एमपीएससी पेपरफुटीविरोधात रोहित पवार आक्रमक; लातुरमधून प्रशासनाला दिला इशारा