भिलाई पोलिसांची नागपुरातील बहिणींना अटक नातींनी केला आजीचा खून
इगतपुरी : इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याची भरदिवसा हत्या करण्यात आली. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. भाऊबंदकीच्या वादातून चुलत भावानेच खून केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हेदेखील वाचा : चाकूचा धाक दाखवला अन् मोबाईल पळवून नेला; रस्त्याने जाताना तरूणाला अडवलं
इगतपुरी शहर हद्दीतील गिरणारे येथे भाऊबंदकीच्या वादातून एका 50 वर्षीय व्यक्तीचा खून झाला. सकाळी दहा वाजेच्या सुमाराला झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर थेट धारदार शस्त्राच्या वाराने झाले. खून झालेला व्यक्ती संशयित आरोपीचा सख्खा चुलत भाऊ असून, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्याआधीच संबंधिताचा मृत्यू झाला.
मदन बबन गोईकणे (वय ५०, रा. गिरणारे, ता. इगतपुरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मदन गोईकणे हे इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागात कर्मचारी होते. संशयित आरोपी महेंद्र भरत गोईकणे याच्याबरोबर सकाळी मदन गोईकणे यांचा वाद झाला होता. या वादातूनच त्याने मदन यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.
या घटनेत अजूनही काही आरोपी आहेत, अशी चर्चा या परिसरात सुरु आहे. संशयित आरोपी महेंद्र गोईकणे याने धारदार शस्त्राने त्यांचा खून केल्याबाबतची फिर्याद मयताची पत्नी सिंधूबाई मदन गोईकणे यांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
हेदेखील वाचा : प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणाची हत्या; दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने पहिल्या प्रियकराला संपवलं
याप्रकरणी इगतपुरी पोलीसांनी या घटनेतील संशयित आरोपी महेंद्र भरत गोईकणे याला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापुसाहेब दडस यांनी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.