File Photo : Crime
लोणार : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने प्रेयसीने पहिल्या प्रियकराची हत्या घडवून आणली. प्रेयसीने लोणार सरोवरात फिरण्याच्या बहाण्याने आणल्यानंतर नियोजित कटानुसार दबा धरून बसलेल्या प्रियकराने मागून गळा आवळत खून केला.
हेदेखील वाचा : यशश्री शिंदे यांचा आरोपी दाऊद शेखला सहा दिवसाची पोलीस कोठडी
यामध्ये हत्या झालेला मृतक व आरोपी हे परभणी जिल्ह्याचे रहिवासी आहेत. मृत तरुण बेपत्ता असल्याने त्याचा शोध घेत असताना गावातील विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आल्यानंतर खुनाचा गुन्हा उघडकीस आला.पोलिसांनी आरोपी प्रियकर व प्रेयसीस अटक केली आहे.
अर्जुन दिलीप रोडगे (28, रवळगाव, ता. सेलू, जि. परभणी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अर्चना विठ्ठल सरोदे (29, रवळगाव, ता. सेलू) व ज्ञानेश्वर उर्फ माऊली आहेलाजी डुकरे (24, खडुळा, ता. पाथरी, जी. परभणी) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात आणखी एका आरोपीचा सहभाग असून, त्याचाही शोध सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
हेदेखील वाचा : तब्बल 100 सीसीटीव्ही तपासून लावला ‘त्या’ ट्रकचालकाचा शोध, असा अडकला जाळ्यात
मृत अर्जुनचा मृतदेह लोणार सरोवरतील यज्ञेश्वर मंदिराजवळील दर्गा रोडच्या बाजूला घनदाट जंगलातील जाळीत फेकून देण्यात आला होता. अर्जुन दिलीप रोडगे हा शुक्रवारपासून (दि. 2) बेपत्ता होता. याबाबत त्याचे वडील दिलीप बाबाराव रोडगे यांनी सेलू पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. 3) तक्रार दाखल केली होती. सेलू पोलिसांनी तपासचक्रे जलदगतीने फिरविली.
अर्जुनचे रवळगावातीलच अर्चना हिच्याशी अनैतिक संबंध
अर्जुन रोडगे याचे रवळगावातीलच अर्चना हिच्याशी अनैतिक संबंध असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार महिलेस ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारी अर्चना पोलिसांसमोर शरण आली. ज्ञानेश्वर डुकरे या आपल्या प्रियकराच्या मदतीने लोणार सरोवरात गळा आवळून अर्जुनचा खून केल्याची कबुली तिने दिली.