Kolhapur Crime : स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दुचाकी चोरीतील संशयित आरोपींना ठोकल्या बेड्या
कुरुंदवाड : कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत शिरोळ तालुक्यातील वाहन चोरी प्रकरणी दोन संशयित आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला अटक केले आहे. त्यांच्याकडून १ लाख १० हजार रुपये किमतीच्या ५ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ४ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
या प्रकरणी संजय रमेश आंबी (वय १९, रा. गंगापूर, ता. शिरोळ), आशपाक सादात कुन्नुरे (वय १९, रा. लालनगर, तेरवाड, ता. शिरोळ) आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक (नाव गोपनीय) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी एक विशेष तपास पथक तयार केले. पोलीस अंमलदार महेंद्र कोरवी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, कुरुंदवाड आणि शिरोळ परिसरात वाहन चोरी करणाऱ्या टोळीविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तेरवाड येथील बसस्टॉपजवळ पोलिसांनी सापळा रचला. संशयित आरोपी तेथे चोरीच्या दुचाकींची विक्री करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
संशयित आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी कुरुंदवाड आणि शिरोळ परिसरातून ५ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी ही सर्व वाहने हस्तगत केली असून, आरोपींकडून आणखी काही वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हे सुद्धा वाचा : आता वाहनचालकांना लागणार शिस्त; पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.