
भाडेकरू बनून घरमालकांनाच लुटले, पोलिसांनी 'बंटी-बबली' दाम्पत्याला ठोकल्या बेड्या; तब्बल...
नाशिक : भाड्याने राहण्यासाठी घर घेऊन घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि संधी मिळताच त्यांच्याच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारायचा, असा अनोखा गुन्हेगारी फंडा अवलंबणाऱ्या ‘बंटी-बबली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पती-पत्नीला अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या कारवाईत सुमारे २४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नानासाहेब वाकचौरे (रा. विजयनगर, नाशिक) यांच्या घरातून २३ जून रोजी सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यामध्ये एका संशयित महिलेची हालचाल आढळून आली.
त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून संबंधित महिलेची ओळख निश्चित केली. आधारकार्डच्या माहितीच्या आधारे आरोपींचे मोबाईल क्रमांक मिळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून बोईसर (जि. पालघर) येथून नवनीत मधुकर नाईक (वय ५६, रा. भांडुप, मुंबई) व त्याची पत्नी स्मिता नवनीत नाईक (वय ४२) यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींकडून १६ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, त्यावेळच्या चोरीतील सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांचा माल, ज्याची सध्याची बाजारभावानुसार किंमत २१ लाख ११ हजार रुपये इतकी आहे, तो जप्त करण्यात आला. तसेच ८ मोबाईल फोन, एक लॅपटॉप व इतर साहित्य असा एकूण २४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
‘बंटी-बबली’ दाम्पत्य जेरबंद; अनेक गुन्हे उघडकीस
तपासात धक्कादायक बाब समोर आली असून हे दोन्ही आरोपी पती-पत्नी वेगवेगळ्या शहरांमध्ये भाडेकरू म्हणून राहत होते. घर घेताना ते कोणताही अधिकृत भाडेकरार करत नसत. तसेच स्वतःचा कायमस्वरूपी पत्ता किंवा खरी ओळखही देत नसत. काही दिवस घरमालकांचा विश्वास संपादन करून योग्य संधी साधत घरातील सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरून पसार होत असत. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना भाडेकरू ठेवताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी व पोलिस व्हेरिफिकेशन करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, आरोपींविरोधात अंबड, घोटी, उरण, तळोजा, वाळूज, भोर, बडनेरा, पोयनाड,, कोपरगाव, वाशी (मुंबई), सदर बाजार, छावणी, मालेगाव तालुका आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे आणखी अनेक घरफोड्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हे सुद्धा वाचा : बहिणीसमोरच भावावर चाकूने केले सपासप वार; कॉलेज परिसरात हल्ला झाल्याने एकच खळबळ
ही कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी, पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, योगेश देसले, सुभाष ठुबे, समाधान शिंदे, उल्हास गांगुर्डे, केशव ढगे, अनिल गाढवे, मयूर पवार, योगेश शिरसाट व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे भाडेकरूच्या आडून घरफोड्या करणाऱ्या या ‘बंटी-बबली’ दाम्पत्याचा पर्दाफाश झाला असून, त्यांच्या अटकेमुळे राज्यातील आणखी अनेक चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.