सौजन्य - नवराष्ट्र टीम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी शिक्रापूर येथील व्यावसायिकांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी आपापली दुकाने बंद करून घरी गेले होते. त्यानंतर मध्यरात्री ते ८ ऑक्टोबरच्या पहाटेच्या दरम्यान चोरट्यांनी परिसरातील दुकानांना लक्ष्य केले. पाबळ चौकातील पलांडे मेडिकलसह न्यू साई मेडिकल, जय मल्हार मेडिकल, राजविका मेडिकल, सह्याद्री मेडिकल, श्री स्वामी समर्थ मेडिकल, शांताई मेडिकल, लीलावती मेडिकल, कल्याणी मेडिकल अशा अनेक मेडिकल दुकानांचे कुलूप फोडण्यात आले. याशिवाय वीरा ज्वेलर्स, केक हाईटस शॉप, एसी ज ब्रॅण्ड फॅब्रिक, करंजे गॅस एजन्सी आणि श्री भादरीया इमिटेशन ज्वेलरी या दुकानांमध्येही चोरी करण्यात आली. एकाच रात्री १३ दुकानांना लक्ष्य करण्यात आल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून आरोपीचा शोध
घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. काही दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये चोरटे कैद झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासातून मयूर शिंदे याच्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्या पथकाने तळेगाव दाभाडे येथे कारवाई करून मयूर शिंदे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने तीन साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी तानाजी खुशालराव पलांडे (वय ४७, रा. इनामवस्ती, मुखई, ता. शिरूर) यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील इतर तीन साथीदारांचा शोध सुरू असून, चोरीचा मुद्देमाल आणि अन्य बाबींचा तपास पोलीस करीत आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार हनुमंत गिरमकर करीत आहेत.
Ans: शिक्रापूर येथे चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल १३ दुकाने फोडून चोरी केली. यामध्ये मेडिकल, ज्वेलर्स, कपड्यांचे दुकान आणि इतर व्यावसायिक दुकानांचा समावेश होता.
Ans: मयूर जितेंद्र शिंदे (वय १९, रा. भोसरी, पुणे) याला पोलिसांनी तळेगाव दाभाडे येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे.
Ans: मयूर शिंदे याने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने १३ दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या साथीदारांचा शोध सुरू आहे.






