अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मुश्रीफ यांची भूमिका स्पष्ट (Photo - X)
Gokul Election : कोल्हापूरच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक अखेर पार पडली आहे. अनेक वादविवाद, आरोप – प्रत्यारोप तसेच राज्य सरकारने नेमलेल्या शासननियुक्त संचालकांवरून झालेल्या गदारोळानंतर हि निवडणूक पार पडली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीला यश मिळालं तर सतेज पाटील यांच्या आघाडीचा पराभव झाला. यावरून राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला. अश्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे. (Gokul Election)
अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर आता निवडणुकीतील कुरघोड्या आणि राजकीय गणितांना बाजूला ठेवून दूध संघाच्या कामकाजावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेसह संजय राऊत आणि रोहित पवार यांच्याबाबतही भाष्य केलं.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर आता राजकारण करण्यापेक्षा दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. कोल्हापूर वगळता राज्यातील इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दूध उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये गोकुळच्या दुधाला चांगला भाव मिळण्याची संधी आहे, असं त्यांनी नमूद केलं.
निवडणुकीच्या निकालाचा उल्लेख करताना मुश्रीफ म्हणाले की, समोरच्या गटाचे 13 आणि आमचे 12 संचालक निवडून आले होते. त्यामुळे कोणत्याही एका गटाला स्वतंत्रपणे कोरम पूर्ण करणं शक्य नव्हतं. ही वैधानिक अडचण राज्य सरकारने दूर केली. आता नवनिर्वाचित अध्यक्षांनी पुढाकार घेत कामाला सुरुवात केली आहे.
यावेळी संजय राऊत यांच्यावरही मुश्रीफांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र, इतर पक्षांवर बोलण्याआधी राऊत यांनी स्वतःच्या पक्षाची परिस्थिती पाहावी, असा टोला त्यांनी लगावला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोण चालवत आहे, हे सर्वांना माहीत असल्याचं सांगत त्यांनी राऊत यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेवरही मुश्रीफ यांनी मिश्किल टिप्पणी केली. रोहित पवार यांनी यापूर्वीच काही गोष्टी स्पष्ट करण्याचं सांगितलं होतं. आता त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोर मफलर लटकवला आहे. 16 तारखेनंतर ते नेमकं काय बोलतात, हे पाहू आणि त्यानंतर प्रतिक्रिया देऊ, असं मुश्रीफ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात महत्त्व आलं असताना मुश्रीफांच्या या विधानामुळे या विषयावरील उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Gokul Election : गोकुळच्या मतमोजणीवेळी शरद पवारांचा सतेज पाटलांना फोन! नेमकं काय म्हणाले होते पवार?
Ans: गोकुळ दूध संघातील निवडणुकीचं राजकारण संपलं असून आता दूध उत्पादन आणि संकलन वाढवण्यावर भर देणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
Ans: सतेज पाटील यांच्या गटाचे 13 आणि महायुतीचे 12 संचालक निवडून आले होते. त्यामुळे कोरम पूर्ण करण्यासंदर्भात वैधानिक अडचण निर्माण झाली होती.
Ans: संजय राऊत यांनी इतर पक्षांवर टीका करण्यापेक्षा आधी स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यावी आणि पक्षातील खासदार-आमदारांची संख्या पाहावी, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.






