
Satara Crime : हॉस्पिटलमध्ये केअरटेकर बनून मोबाईलची चोरी; आरोपीला 4 तासातचं ठोकल्या बेड्या
सातारा : साताऱ्यातील सिटी हॉस्पिटलमध्ये केअरटेकर बनून मोबाईलची चोरी करणाऱ्या अतुल विलास ठोंबरे (वय २२, राहणार झेडपी कॉलनी शाहूपुरी) याला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या चार तासात जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल व मोटरसायकल असा ८५००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ७ फेब्रुवारी रोजी शनिवार पेठेतील सिटी हॉस्पिटल मध्ये महत्त्वाचा डाटा असलेला एक मोबाईल चोरीला गेल्याची फिर्याद हॉस्पिटलचे मॅनेजर यांनी नोंदवली होती. विषय गंभीर असल्याने सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी तत्काळ तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही द्वारे माहिती घेतली आणि एका संशयित युवकाची बातमीदारामार्फत ओळख पटवण्यात आली. या युवकाचा शोध घेत असताना तो राजवाडा परिसरात असल्याचे आढळून आले. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला, मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने हॉस्पिटलमध्ये मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले.
यापूर्वीही या आरोपीने केअर टेकर बनून वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये चोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ८५००० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, निलेश यादव, सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, सचिन रेठे, इरफान मुलांणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी तपासात सहभाग घेतला होता. या तपासाचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कौतुक केले.
पत्ता विचारण्याच्या बहाणा करून पुण्यात चोरी
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. मध्यभागात चोरट्यांनी एका सराफ बाजारातील कारागिराला पत्ता विचारण्याच्या बहाणा करून त्याच्या हातातील २० लाखांचे दागिने असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. रविवार पेठेतील मोती चौक परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चिरनजीत अंबिका बाग (वय २३, सध्या रा. दगडी नागाेबा मंदिराजवळ, रविवार पेठ, मूळ रा. पश्चिम बंगाल) याने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.