
संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त
छत्रपती संभाजीनगर : एके-४७ सारखे अत्याधुनिक शस्त्र लपवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मिटमिटा येथील दिवंगत कामगार नेते बाबा फर्जन यांच्या फार्महाऊसवर पहाटे धाड टाकली. सुरुवातीला केवळ एक पिस्तूल हाती लागल्याने पथकाने संपूर्ण फार्महाऊसाची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येत गेल्या. तब्बल ४ रायफल, २ पिस्तुले, २ एअरगन, २१ धारदार शस्त्रे, ६ हजार ३५० काडतुसे, ५ कोटी २६ लाखांची रोकड, २९.४३ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि विदेशी मद्याचा साठा असा एकूण ५ कोटी ६५ लाख ५४ हजार ४३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तब्बल २४ तास चाललेल्या या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या छाप्यामुळे १९८० ते १९९० च्या दशकात शहराच्या गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळात प्रभाव टाकणारे बाबा फर्जन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या प्रकरणी शिलाबाई बाबा फर्जन दोरडी उर्फ शिला साळवे हिच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांना मिटमिटा परिसरातील गट क्रमांक १२६ मधील फार्महाऊसमध्ये मोठ्या बंदुकीचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. शुक्रवारी पहाटे अडीच वाजता पोलिसांनी फार्महाऊस गाठले. घरात प्रवेश करताच पोलिसांनी शिलाबाई दोरडी उर्फ शिला साळवे हिच्याकडे शस्त्रांबाबत विचारणा केली; मात्र तिने माहिती नसल्याचे सांगितले. खोल्यांची झडती घेण्यास सुरुवातीला विरोध करण्यात आला.
दोन वर्षांपूर्वीच बदलले होते निवासस्थान
संबंधित खोलीची किल्ली सुरेश सुमेर वर्मा यांच्याकडे असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वर्मा यांना बोलावण्यात आले. काही वेळ टाळाटाळ केल्यानंतर त्यांनी किल्ली दिली आणि खोली उघडताच पोलिसांसमोर शस्त्रे, रोकड, दागिने आणि काडतुसांचा प्रचंड साठा उघड झाला. बाबा फर्जन हा अनेक वर्षांपासून सिटी चौक येथील बंगल्यात राहत होता, मात्र काही कालावधीपासून त्याची प्रकृती ठीक नसल्याने ते दोन वर्षांपूर्वी पडेगाव मिटमिटा येथील फार्म हाऊसमध्ये शिफ्ट झाले. त्यावेळी सर्व रक्कम आणि शस्त्र हलविण्यात आल्याची माहिती आहे. फार्महाऊसच्या बेडरूममधील लोखंडी कपाटे, लाकडी कपाटे आणि पत्र्याच्या कोठ्यांची तपासणी करताना पोलिसांना ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची रोकड आढळली, १०, २०, ५०, १०० आणि २०० रुपयांच्या नोटा पिशव्या, खोके आणि कोठ्यांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. अनेक नोटांवरील बँकेचे सीलही अबाधित असल्याने एवढी मोठी रोकड नेमकी कुठून आली, याचा तपास सुरू झाला आहे. विशेष म्हणजे काही नोटांचे बंडल हे २००३ च्या पेपरमध्ये गुंडाळलेली होते तसेच त्या बंडलला रबर देखील चिकटलेले होते.
रायफल, पिस्तुले आणि ६,३५० काडतुसे
धाडीत ४ रायफल, २ पिस्तुले आणि २ एअरगन जप्त करण्यात आल्या. याशिवाय ६ हजार ३५० जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. त्यामध्ये १२ बोरची ६३२ आणि ७.६५ एमएम पिस्तुलासाठीची ३,८४० काडतुसे आहेत. प्राथमिक तपासात चार शस्त्रांचे परवाने बाबा फर्जन यांच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान २९ लाख ४३ हजार ५९८ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. त्यात २१.३४ लाखांचे सोन्याचे आणि ८.०९ लाखांचे चांदीचे दागिने आहेत. याशिवाय अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि विविध कंपन्यांच्या ४५ विदेशी मद्याच्या बाटल्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्या.
हे सुद्धा वाचा : बीडमध्ये मध्यरात्री थरार! किरकोळ वादातून 21 वर्षीय तरुणाचा चाकूने निर्घृण खून
शहरात निधन….. पुण्यात दफनविधी
१९९५ नंतर बाबा फर्जान यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. त्यानंतर त्यांनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर असा प्रवास सुरू ठेवला. वाढत्या वयानुसार त्यांनी सार्वजनिक जीवनापासून काहीसे अंतर राखले होते. वयाच्या ९१ व्या वर्षी १३ जून २०२६ रोजी शहरातील एका रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांचा दफनविधी पुण्यात करण्यात आला.