
डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई
गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाबाबत विशेष सूचना दिल्या होत्या. उच्च आवाजाच्या डीजे साऊंड सिस्टिमचा वापर करू नये, तसेच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनीमर्यादेचे पालन करावे, अशा सूचना गणेश मंडळांना देण्यात आल्या होत्या.
शिरगाव-परंदवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातव्या दिवशी एकूण ३८ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान चांदखेड आणि ओझर्डे येथील मंडळांकडून निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात ध्वनीक्षेपक यंत्रणा वाजविण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर दोन्ही मंडळांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.
गणेश विसर्जन मिरवणुकीत उत्साह साजरा करताना ध्वनीमर्यादा आणि न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. उच्च आवाजात डीजे वाजवून सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांवर कोणतीही पूर्वसूचना न देता कायदेशीर कारवाई केली जाईल. गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करून ध्वनिप्रदूषण टाळावे. – देवेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शिरगाव-परंदवडी पोलिस ठाणे.
पुणे पोलिसांचा मोठा निर्णय!
पुण्याच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीला लागणारा तब्बल ३० ते ३२ तासांचा कालावधी कमी करण्यासाठी पुणे पोलिसांनी यंदा मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन किंवा त्याहून अधिक वर्षांपासून मुख्य मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनाच यंदा विशेष बाब म्हणून प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, पुढील वर्षापासून मंडळांच्या सहभागाबाबत कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दिली.