सौजन्य - नवराष्ट्र टीम
आळेफाटा : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील मोक्याच्या ठिकाणी असलेले बेल्हे बसस्थानक सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. येथील बसस्थानक वाहतूक नियंत्रक कक्ष गेल्या ६ ते ७ वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वाढती प्रवासी संख्या आणि शैक्षणिक संस्थांच्या पार्श्वभूमीवर हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे असतानाही एसटी महामंडळाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
बेल्हे परिसरातून अहिल्यानगर, कल्याण, पारनेर, सुपा तसेच पंचक्रोशीतील विविध गावांकडे जाण्यासाठी दररोज शेकडो नागरिक एसटी बससेवेचा आधार घेतात. मात्र, प्रत्यक्ष बसस्थानकावरील नियंत्रक कक्षच बंद असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या बसची वेळ, उपलब्ध मार्ग आणि फेऱ्यांची अचूक माहिती प्रवाशांना मिळत नाही. परिणामी नागरिकांना तासन्तास स्थानकावर ताटकळत राहावे लागत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि पासची समस्या
परिसरात नामवंत महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था असल्याने शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची येथे मोठी गर्दी असते. वाहतूक नियंत्रक कक्ष बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना मासिक बस पास काढणे, त्याचे नूतनीकरण करणे किंवा शैक्षणिक सवलतीच्या योजनांची माहिती मिळवणे अत्यंत कठीण झाले आहे. नियंत्रक कक्ष सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होऊ शकतात.
बसेस बाह्यमार्गाने; प्रवाशांची गैरसोय
वाहतूक नियंत्रक नसल्याने स्थानकात येणाऱ्या एसटी बसेसची कोणतीही अधिकृत नोंद ठेवली जात नाही. याचाच गैरफायदा घेत अनेक चालक व वाहक बसेस बेल्हे बसस्थानकात न आणता परस्पर बाह्यमार्गावरून (बायपास) घेऊन जातात. यामुळे स्थानकात ताटकळत थांबलेल्या प्रवाशांना बस वेळेवर मिळत नाही, तसेच अनेकदा रात्रीच्या वेळी महिला व ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होतात.
‘नियंत्रक कक्ष आहे, पण सुविधा कुठे?’
एकीकडे एसटी महामंडळ आर्थिक तोट्यातून बाहेर पडण्यासाठी उत्पन्नवाढीचे नवनवीन उपाय शोधत असताना, दुसरीकडे भरपूर प्रवासी क्षमता असलेले बेल्हे बसस्थानक मात्र वर्षानुवर्षे वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा व तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘बसस्थानक नियंत्रक कक्ष आहे, पण सुविधा कुठे?’ असा संतप्त सवाल आता प्रवासी विचारत आहेत.
विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान, पासची गैरसोय आणि बसेसची विस्कळीत झालेली वाहतूक त्वरित सुरळीत करण्यासाठी बेल्हे येथील बंद पडलेला वाहतूक नियंत्रक कक्ष तातडीने सुरू करून तिथे कायमस्वरूपी पूर्णवेळ वाहतूक नियंत्रकाची (टीआय) नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.






