मुंढव्यात 'दम मारो दम'; हाॅटेलमधील हुक्का पार्लरवर गु्न्हे शाखेची कारवाई
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंढव्यातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पात्र आणि सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी हाॅटेल मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख, व त्यांचयाही कारवाई केली.
मुंढव्यात गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक गस्त घालत होते. या परिसरातील हाॅटेल स्वेमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. हाॅटेलमधून हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी हाॅटेल मालकासह, व्यवस्थापकाविरुद्ध सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) सन १९१८ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात घरफोडी करणारा अल्पवयीन ताब्यात; तब्बल लाखोंचा मुद्देमाल जप्त
गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.
हे सुद्धा वाचा : मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; कराडमध्ये चोरट्यांचा प्रताप
बावधनमध्ये हुक्का पार्लरवर कारवाई
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बार मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर बावधन पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये 6,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 12) रात्री करण्यात आली. सौम्यरंजन शिशिरकुमार बेहरा (वय 21, रा. वाकड), राहुल श्रीकांत कुलकर्णी (वय 37, रा. भुगाव, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.