
बसस्थानकात महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, मंचर पोलिसांची कारवाई; तब्बल...
मंचर : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांंमध्ये भिती निर्माण होत आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता बसस्थानक परिसरात गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या अंगावरील आणि पिशवीतील दागिने चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना आणि सोने खरेदी करणाऱ्या एकाला मंचर पोलिसांनी गजाआड केले आहे. आरोपींकडून चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अशोक बबन भोसले (वय २८, रा.कासारी, ता. आष्टी, जि.बीड, सध्या रा.हिरडगाव), अश्विनी अविनाश भोसले (वय २६, रा. माहिजळगाव, ता. कर्जत, जि.अहिल्यानगर), सतीश मधुकर गोरे (वय ५४, रा. शिवाजीनगर, जामखेड, जि.अहिल्यानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मंचर बसस्थानकात एसटीमध्ये बसण्यासाठी चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरीस जाण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली. गुन्ह्यातील आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत असताना २४ सप्टेंबर रोजी आरोपी मंचर बसस्थानकात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने अशोक भोसले आणि अश्विनी भोसले यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोने खरेदी करणारा सतीश गोरे याला अटक करण्यात आली.
तपासात आरोपींनी मंचर, खेड व नारायणगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.