
डॉ मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणात मोठी कारवाई; पतीलाच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नेमकं काय आहे प्रकरण?
६ मार्च २०२६ रोजी गंगापूर रोडवरील डी. के. नगर भागातील रेवती ब्लू अपार्टमेंटमध्ये डॉ. मनीषा जेजुरकर (४०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांची बहीण रोहिणी थोरात यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांत डॉ. नीलेशविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीनुसार, २०२१ पासून डॉ. नीलेश हे पत्नीकडे दुर्लक्ष करून एका त्रयस्थ महिला डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वागत होते. जानेवारी २०२६ मध्ये त्या महिला डॉक्टरने डॉ. मनीषा यांना फोन करून तुझ्या बुद्धीची पातळी कमी आहे असे म्हणत हिणवले होते. पतीचा सततचा मानसिक छळ आणि कौटुंबिक कलहाला कंटाळून डॉ. मनीषा यांनी जीवनयात्रा संपवल्याचे तक्रारीत नमूद आहे.
आत्महत्या की हत्या? न्यायालयात संशय
खिडकीला दोरी बांधून आत्महत्या होणे अशक्य वाटत असल्याने आणि शवविच्छेदन अहवालात फेरफार झाल्याचा संशय व्यक्त करत, ‘ही आत्महत्या नसून हत्या असू शकते’ असा जोरदार युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला होता. मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात हत्येचा दाट संशय व्यक्त करत १० सप्टेंबरला त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कोर्टाचे महत्तवाचे निरीक्षण
विवाहबाह्य संबंधः ९ एप्रिल २०२६ रोजी नोंदवलेल्या एका महिला डॉक्टरच्या जबाबामुळे नीलेश यांच्या विवाहबाह्य संबंधांना पुष्टी मिळाली.
चिथावणीचा प्राथमिक पुरावाः ५ मार्च रोजी एका लग्नसमारंभात झालेला जाहीर अपमान आणि दुसऱ्याच दिवशी (६ मार्च) झालेली आत्महत्या यातील अत्यंत अल्प कालावधी पाहता, गुन्हेगारी हेतू आणि चिथावणी दिल्याचे प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट होते.
हत्येची शक्यता : हे प्रकरण केवळ आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे नसून हत्येचेही असण्याची दाट शक्यता न्यायालयाने वर्तवली आहे.