सिंहगड रस्ता भागात दुचाकी चोरट्यांना पकडले; पाच दुचाकींसह लॅपटॉप जप्त
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सिंहगड रोड परिसरात संशयास्पद फिरत असताना दोन दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. चौकशीतून या दोघांकडून पोलिसांनी ५ दुचाकी आणि १ रिक्षा तसेच लॅपटॉप जप्त केला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी ही कारवाई केली आहे
सोपान रमेश तोंडे (वय २७, रा. मुळशी, जि. पुणे), आकाश सुनील नाकाडे (वय २९, सध्या रा. नाईक आळी, धायरी, मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
तोंडे आणि नाकाडे सराइत चोरटे आहेत. सिंहगड रस्ता परिसरातून त्यांनी दुचारी चोरली होती. आरोपी तोंडे व नाकाडे बाह्यवळण मार्गवरील नवले पूल परिसरातून वडगावकडे निघाले होते. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हद्दीत सिंहगड पोलिसांचे पथक गस्त घालत होते. तेव्हा गस्त घालणारे पोलीस कर्मचारी देवा चव्हाण, सागर शेंडगे यांना त्यांच्या बातमीदाराकडून एक संशयित फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने नवले पूल परिसरात सापळा लावून दोघांना पकडले. त्यांची चैाकशी केली. चौकशीत त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. तपासात दोघांनी पाच दुचाकी, लॅपटॉप, कॅमेरा चोरीची कबुली दिली. तोंडे, नाकाडे यांच्याकडून पाच दुचाकी, रिक्षा, लॅपटॉप, कॅमेरा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अल्पवयीनांकडून दोन दुचाकी जप्त
मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीनांना भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. भारती विद्यापीठ परिसरात तपास पथकातील पोलीस कर्मचारी मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी गस्त घालत होते. तेव्हा अल्पवयीन मुलांबाबत माहिती मिळाली. सापळा लावून त्यांना पकडले. दोघांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या असून, वरिष्ठ निरीक्षक सावळराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
कारची काच फोडून चोरी
राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातील विमाननगर परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी तब्बल दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली असून, या चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी नितेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहा व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त मुंबईहून विमाननगर येथे आले होते. तेव्हा विमाननगर भागातील वाटिका सोसायटीसमोर त्यांनी रविवारी रात्री कार लावली. नंतर ते कामाच्या ठिकाणी गेले. त्यावेळी चोरट्यांनी कारची काच फोडली. कारमधील पिशवीत ठेवलेली साडेदहा लाखांची रोकड चोरुन पोबारा केला. घटना लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.