टोळक्याची तरुणाला कोयत्याने मारहाण; पोलिसांनी 7 जणांना पकडले
पुणे : एक मोठी बातमी समोर आली आहे. बोपदेव घाट तसेच त्या घाटात असलेल्या ट्रिनिटी कॉलेज परिसरात दहशत बसविण्यासाठी कॉलेजच्या समोरील रस्त्यावर तरुणाला कोयत्याने बेदम मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. कोंढवा पोलिसांनी सात जणांना बेड्या ठोकत या आरोपींकडून शस्त्र तसेच वाहने जप्त केली आहेत.
भावेश बाळासाहेब कुंजीर (वय २३, रा. सासवड), अथर्व कैलास पवार (वय २१, रा. बी टी कवडे रोड, दळवीनगर, घोरपडी), सुरज सचिन राऊत (वय २१, रा. सासवड- बोपदेव घाट रोड, येवलेवाडी), आर्यन विलास पवार (वय १८, रा. ओम सोसायटी, दळवीनगर, घोरपडी), सौरभ प्रदिप लोंढे (वय १८, रा. संदेश सहकारी सोसायटी, संभाजीनगर, धनकवडी, मुळ रा. सातेफळ, ता. कळंब, जि. धाराशिव), राज दिगंबर रोंगे (वय १९, रा. सिंगापूर होम्स, येवलेवाडी), वरुण बबन भोसले (वय २१, रा. आनंदनगर, जेजुरी ता. पुरंदर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश देसाई, विशाल मेमाणे व त्यांच्या पथकाने केली.
ट्रिनिटी कॉलेजसमोरील रोडवर १६ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता विश्वजित बाबाजी हुलवळे (वय १९, रा. येवलेवाडी) याला कोयत्याने मारहाण करुन जबर जखमी केले होते. त्यावरुन कोंढवा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतताना १८ जानेवारी रोजी पोलीस हवालदार सतिश चव्हाण व विशाल मेमाणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुन्ह्यातील आरोपी हे राज रोंगे याच्या येवलेवाडीतील सिंगापूर होम्स येथे लपले आहेत. पोलिसांनी तातडीने तेथे जाऊन घरावर छापा घालून सातही आरोपींना पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली धारदार शस्त्रे व वाहने असा एकूण ३ लाख ८० हजारांचा माल जप्त केला आहे.
हे सुद्धा वाचा : चिंचवडमध्ये रिक्षा चालकाला पाईपने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
दगडाने ठेचून मुलाचा खून
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली नगर रस्त्यावरील वाघोली भागात वाघेश्वरनगर येथे एका अल्पवयीन मुलाचा लोखंडी रॉड तसेच दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला बोलत असल्याच्या रागातून हा खून झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गणेश वाघू तांडे (१७) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण पेटकर (वय ६०), नितीन पेटकर (वय ३१) आणि सुधीर पेटकर (वय ३२) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास घडली आहे.