
चोरांची नवी करामत! PMP बसमध्ये टोळी सक्रिय; पोलिसांकडून आठ दिवस गस्त अन् पुन्हा...
गर्दीचा फायदा घेत चोरांची टोळी सक्रिय
पोलिसांकडून आठ दिवसांची गस्त
पीएमपी बसमधील चोरीच्या घटनांमध्ये वाढ
पुणे/चंद्रकांत कांबळे: पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा ही पुणे शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. साधारणपणे दररोज दहा ते अकरा लाख प्रवासी पीएमपी बसने प्रवास करतात. मात्र, अलीकडील काळात पीएमपी बसमधील चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दररोज अशा घटना घडत असून, यामध्ये महिला प्रवाशांचे चेन,सोन्याच्या बांगड्या,प्रवाशांचे मोबाईल,पाकिटे आदी वस्तू चोरीला जात आहेत.तत्कालीन पीएमपी अध्यक्ष दिपा मुधोळ–मुडे यांनी या चोरांना आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठवले होते. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून एक पथक नेमून आठ दिवस गस्त घालण्यात आली. मात्र, त्यानंतर परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे वैसे’ झाली आहे.
सद्यस्थितीत अज्ञात व्यक्तींकडून प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू, पाकिटे व इतर साहित्य चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. तसेच काही असामाजिक इसमांकडून बीआरटी बसस्थानकांमध्ये अश्लील मजकूर रंगवून बसस्थानके विद्रूप करण्याच्या घटनाही समोर येत आहेत. यामुळे प्रवाशांची, विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होत असून, याबाबत महामंडळाकडे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.
परिवहन महामंडळाकडून पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच पीएमआरडीए हद्दीत विविध मार्गांवर बसचे संचलन सुरू आहे. सध्या पीएमपीमार्फत एकूण ३८८ मार्गांवर बससेवा सुरू असून, दररोज २१,४४५ फेऱ्यांद्वारे दहा ते अकरा लाख प्रवासी प्रवास करतात. चोरीसारख्या अनुचित घटना टाळण्यासाठी सुमारे ४० गर्दीच्या मार्गांची माहिती पीएमपी प्रशासनाने पत्रव्यवहाराद्वारे पोलीस प्रशासनाला दिली होती. मात्र, त्यानंतर केवळ आठ दिवसच पोलीसांकडून गस्त घालण्यात आली. सध्या पुन्हा परिस्थिती पूर्ववत झाली असून, महिला व इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! PMP प्रशासनाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; निष्काळजीपणा आढळल्यास…
प्रवाशांनी चोरी झाली आहे असे लक्षात येताच काय करावे?
प्रवासादरम्यान चोरी झाल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी सर्वप्रथम आपल्या तिकिटावर दिलेल्या ०२०-२४५४ ५४५४ या क्रमांकावर तक्रार करावी. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. पीएमपीच्या बहुतांश बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. जून ते डिसेंबर या सात महिन्यांच्या कालावधीत पीएमपीकडून चोरीसंदर्भातील ५९ व्हिडिओ संबंधित पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत.
चढताना चोरीचे प्रमाण अधिक
विशेषतः प्रवासी बसमध्ये चढताना चोरी होण्याचे प्रमाण जास्त आहे. बसमध्ये चढताना गर्दी अधिक असते. याचाच फायदा घेत मोबाईल, पर्स, सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू चोरीला जात आहेत.
प्रवासी मोबाईलमध्ये गुंग
बसमध्ये बसल्यानंतर बहुतांश प्रवासी मोबाईलमध्ये गुंग असल्याचे दिसून येते. तर काही प्रवासी प्रवासादरम्यान झोपतात. याचाच फायदा चोर घेतात. हातावर रुमाल किंवा जॅकेट टाकून चोरी केली जाते. त्यामुळे प्रवाशांनी स्वतःही सतर्क व जागरूक राहणे गरजेचे आहे.
पीएमपी आणि पोलिसांचे संयुक्त पथक आवश्यक
पीएमपी बसमधून चोरांची गॅंग फिरत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे महिला व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पीएमपी व पोलीस प्रशासनाने संयुक्त पथक तयार करून या प्रकरणात ठोस भूमिका घेणे गरजेचे असल्याची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
Pune News: ‘PMP’मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात…
पीएमपीचा आढावा
एकूण बस : २,०४९
संचलनातील बस : १,७९५
एकूण मार्ग : ३८८
दैनंदिन फेऱ्या : २१,४४५
सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीचा फायदा चोर घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजचा प्रभावी वापर करून या चोरांना पकडले पाहिजे. अनेकदा पोलीस चोरांविरुद्ध तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करतात, असा अनुभव येतो. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि पीएमपी प्रशासन यांनी संयुक्त पथक तयार करून या समस्येची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने यावर लवकरात लवकर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
संजय शितोळे,
पीएमपी प्रवाशी मंच