राज्यात चोरट्यांचा धुमाकूळ! घराचे कुलूप तोडून तब्बल 'इतक्या' लाखांचे दागिने लंपास
अकलूज : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता अकलूजमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. घरी कुणी नसल्याचे पाहून बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात दोन चोरट्यांनी चार लाखांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माळीनगर नजीकच्या सवत गव्हाण येथे सोमवारी सकाळी ११ वाजता ही चोरीची घटना घडली आहे. याबाबत अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी चोरट्यांना पकडण्यात यश आलेले नाही. सवत गव्हाण येथील दयानंद जाधव यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
अकलूज येथील आरबीएल बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदावर जाधव हे काम करतात, ते सोमवारी सकाळी दहा वाजता कामावर गेले होते. दरम्यान सकाळी ११ वाजता त्यांच्या पत्नी माधुरी या डबा देण्यासाठी अकलूजला गेल्या होता. यावेळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांना सवत गव्हाण येथील त्यांच्या मैत्रिणीने फोन करून याबाबत कल्पना दिली. अज्ञातांनी घराचा कडीकोयंडा तोडून निघून गेल्याचे त्यांनी सांगितले. याची माहिती मिळताच जाधव हे पत्नीसोबत सवत गव्हाण येथे तत्काळ दाखल झाले. घरी येताच घराचे कुलूप तोडल्याचे व घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटात पाहिले असता ७ तोळे सोन्याचे गंठण, मिनी गंठण, कर्णफुले, ठुशी, मनी, डोरले असा ऐवज चोरीस गेला असल्याचे दिसले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश लंगुटे करीत आहेत.