संग्रहित फोटो
पुणे : आत्महत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. वेगवेगळ्या कारणावरुन अनेकजण टोकाचा निर्णय घेत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पती आणि सासू-सासरे व इतरांकडून सतत होणाऱ्या शिवीगाळ तसेच मारहाण व जाचाला कंटाळून ३३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सात जणांना अटक केली आहे. ही घटना अप्पर बिबवेवाडी परिसरात घडली आहे. सुवर्णा सर्जेराव जाधव (वय ३३, रा. शेळके वस्ती, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी पती सर्जेराव जाधव, सासरे माणिक भाऊ जाधव (वय ७०), सासू जयश्री माणिक जाधव (वय ६५), लक्ष्मी रामचंद्र कांबळे (वय ४०), पुष्पा दयानंद लोंढे (वय ३५), रोहन दयानंद लोंढे (वय २२), अनुराधा माणिक जाधव (वय ३२) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मुलीचा सर्जेराव याच्याशी २०१६ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर ती सासरी नांदत होती. जाधव कुटूंब अप्पर बिबवेवाडी येथील शेळके वस्तीत राहण्यास होते. विवाहाच्या काही वर्षानंतर मात्र, पती तसेच सासरच्या लोकांकडून सतत त्यांना छोट्या-मोठ्या कारणावरून छळ सुरू केला. वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण केली. तिचा मानसिक व शारिरीक छळ केला. या त्रासाला कंटाळून सुवर्णा हिने दोन दिवसांपुर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तत्काळ पतीसह सात जणांना अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक बाळु चोपडे हे करत आहेत.
ब्रेकअप झाल्याने फार्मसीच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन
चंद्रपुरातील एका तरुणीने ब्रेकअप झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे ही घटना घडली. आस्था कुंदन नगराळे (वय २१, रा. शास्त्रीनगर, भद्रावती, जि. चंद्रपूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. आस्था ही तुळशीराम गायकवाड पाटील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे चंदन पोंगळे यांच्या घरी भाड्याने राहत होती. ८ एप्रिलला रात्री १०.३० च्या सुमारास ती घरच्यांचे फोन उचलत नसल्याने आईने नागपूरला असलेल्या नातेवाईकांना कळवले. तिचे चुलत भाऊ प्रणय नगराळे यांनी तातडीने सातगाव गाठले असता आस्थाने रूममधील सीलिंग फॅनला दुपट्ट्याने गळफास घेतल्याचे दृश्य समोर आले.






