(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Shah Rukh Khan King Movie: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान जवळपास तीन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘किंग’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली असून, शाहरुख खान आणि सुहाना खानची पहिली झलक पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘किंग’ हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी, नाताळच्या पूर्वसंध्येला जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अवघ्या १० दिवस आधी प्रेक्षकांना ट्रेलरची भेट मिळणार आहे. ‘व्हेरायटी इंडिया’च्या वृत्तानुसार, शाहरुख खानच्या ‘किंग’चा ट्रेलर १४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
नाताळच्या सुट्ट्या आणि वर्षाच्या अखेरीस बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करण्याच्या उद्देशाने निर्मात्यांनी प्रमोशनची खास रणनीती आखली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अगदी जवळ ट्रेलर रिलीज करून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणे आणि त्याचा फायदा आगाऊ बुकिंगला मिळवून देणे, हा यामागचा उद्देश असल्याचे म्हटले जात आहे.
शाहरुखच्या दमदार कमबॅकची चाहत्यांना उत्सुकता
‘किंग’च्या माध्यमातून शाहरुख खान २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटांनंतर पुन्हा चित्रपटगृहात झळकणार आहे. चित्रपटातील शाहरुखचा रांगडा फर्स्ट लूक याआधीच सोशल मीडियावर चर्चेत आला होता. त्याच्या वाढदिवशी, २ नोव्हेंबर रोजी चित्रपटातील ‘तू मिल जाये’ हे पहिले प्रमोशनल गाणे प्रदर्शित करण्यात आले असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सचिन-जिगर यांच्या संगीताने सजलेले आणखी एक गाणे या महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर १४ डिसेंबरला ट्रेलर रिलीज होताच चित्रपटाच्या प्रमोशनला आणखी वेग येणार आहे.
‘किंग’मधील सर्वात खास आकर्षण म्हणजे शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान यांची जोडी. या दोघांना पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. ट्रेलरमध्ये त्यांच्या नात्याची आणि भूमिकांची पहिली झलक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
सुहाना खानने झोया अख्तरच्या नेटफ्लिक्सवरील ‘द आर्चीज’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र, ‘किंग’ हा तिचा पहिला चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा चित्रपट ठरणार आहे. त्यामुळे वडील-मुलीच्या या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
दीपिका पदुकोणसोबत शाहरुखची सुपरहिट जोडी पुन्हा येणार
या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. त्यांनी यापूर्वी शाहरुख खानसोबत ‘पठाण’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केले होते. विशेष म्हणजे, ‘किंग’मधून शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या दोघांनी यापूर्वी ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘पठाण’ आणि ‘जवान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
‘किंग’मध्ये शाहरुख खान, सुहाना खान आणि दीपिका पदुकोण यांच्याशिवाय अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि अर्शद वारसी यांसारखे दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. दमदार स्टारकास्ट आणि शाहरुखच्या पुनरागमनामुळे हा चित्रपट वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
आता चाहत्यांचे लक्ष १४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलरकडे लागले आहे. ट्रेलरमधून शाहरुख-सुहानाची पहिली झलक पाहायला मिळणार का आणि ‘किंग’ बॉक्स ऑफिसवर कोणते नवे विक्रम प्रस्थापित करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Anupam Kher: एकच घर होतं, तेही आलिया भट्टला विकलं! अनुपम खेर यांनी संपत्तीच्या चर्चांवर सोडलं मौन






