पुण्यात 400 रुपयांसाठी तरुणाच्या खूनाचा प्रयत्न; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार केले अन्...
पुणे : हातउसने दिलेल्या ४०० रुपयांवरून दोघांमध्ये वादावादी झाल्यानंतर तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याच्या खूनाचा प्रयत्न कण्यात आल्याची घटना घडली आहे. पुणे स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. सचिन शिवाजी माने (वय ३०) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लंब्या नाव असलेल्या आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत माने याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, माने आणि आरोपी लंब्या हे पुणे स्टेशन परिसरात राहायला आहेत. ते किरकोळ कामे करतात. दोघेजण मजुरी करण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांची मैत्री आहे. दरम्यान, माने याने आरोपी लंब्या याला ४०० रुपये हातउसने दिले होते. शुक्रवारी (२७ जून) रात्री माने याने लंब्या याला ४०० रुपये परत मागितले. या कारणावरुन माने आणि आरोपींमध्ये वाद झाला.
पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पार्सल ऑफिसजवळ आरोपीने माने याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. माने गंभीर जखमी झाला. त्यानंतर तो पसार झाला. घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी येथे धाव घेतली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करत आहेत.