सायबर चोरट्यांनी डॉक्टर महिलेला घातला गंडा, तब्बल 'इतक्या' लाखांची केली फसवणूक
पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले असून, पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गॅस पुरवठा बंद करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एरंडवणे येथील एका डॉक्टर महिलेची ५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. चोरट्यांनी महिलेचा मोबाइल हॅक करुन बँक खात्यातून परस्पर रोकड लांबविल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ७३ वर्षीय ड़ॉक्टर महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कर्वेनगर येथील सहवास सोसायटीत राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. गॅस कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्रातून बोलत असल्याचे सांगितले. गॅस बिल थकीत असून, गॅस पुरवठा बंद होईल, अशी भिती त्यांना दाखवली. नंतर चोरट्यांनी त्यांना एमएनजीएल एपीके फाईल पाठविली. ही फाईल त्यांना उघडण्यास सांगितले.
तक्रारदारांनी लिंक ओपन केल्यानंतर मोबाईलचा ताबा आपोआप चोरट्यांकडे गेला. त्यांनी या आधाराने त्यांच्या बँक खात्यातून ४ लाख ९५ हजार रुपये लांबविले. खात्यातून रकम दुसऱ्याच खात्यात वळविल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने अधिक तपास करत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास चांगला नफा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेची ४० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कोंढवा भागात राहतात. १६ फेब्रुवारी रोजी चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविले. महिलेने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. या रकमेवर त्यांना चांगला परतावा देण्यात आला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर गेल्या ५ महिन्यात महिलेने वेळोवेळी ४० लाख २० हजार रुपये जमा केले. रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही, तसेच त्यांना मुद्दल दिली नाही. त्यांनी चोरट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. तेव्हा त्यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. नंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.