
साईबाबांच्या नगरीत 'मॅफेड्रोन' ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
शिर्डी : आंतरराष्ट्रीय स्तरावर पावन आणि धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डी शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक वास्तव समोर येत आहे. शांत आणि आध्यात्मिक वातावरण असलेल्या साईनगरीत अंमली पदार्थ सेवन करणारे एमडी किंवा म्याँव म्याँव या नावाने ओळखतात असे मॅफेड्रोन या घातक आणि बेकायदेशीर कृत्रिम अमली पदार्थाचा गुप्तपणे शिरकाव झाल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. तरुणाईला जाळ्यात ओढण्याचे षड्यंत्र शिर्डी शहर आणि उपनगरीय भागांत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या छुप्या टोळ्यांचे असल्याने मॅफेड्रोनची चर्चा सर्वसामान्यांना अस्वस्थ करणारी आहे.
स्थानिक तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि हॉटेल्स-लॉजिंग व्यवसायाशी जोडलेल्या काही अल्पवयीन युवकांना नशेच्या जाळ्यात ओढले जात असल्याचा संशय आहे. त्याचबरोबर साईभक्तांना नादी लावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरुवातीला स्वस्त दरात किंवा मोफत देऊन नशेची सवय लावली जाते. या घातक अमली पदार्थाचे व्यसन जडले, की त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जातात.
शिर्डीत गुन्हेगारी वाढली
शिर्डीत दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. गर्दीचा गैरफायदा घेऊन काही असामाजिक तत्वे ड्रग्जची तस्करी करत असल्याचा संशय आहे. अमली पदार्थांच्या या अवैध धंद्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढण्याची, चोऱ्या, हाणामाऱ्या आणि छेडछाडीसारख्या घटना घडण्याची शक्यता असतानाच स्थानिक तरुण ड्रगच्या आहारी जाण्याची भिती नागरिकांमध्ये आहे. शिर्डीत वाढत्या संशयास्पद हालचालींमुळे पालक चिंतेत आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी नगर पोलिस प्रशासन, अमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेकडे याप्रकरणी तातडीने विशेष मोहीम राबवून ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडण्याची मागणी केली आहे.
भाड्याच्या खोल्यांवर बंधने आवश्यक
शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात लॉजिंग असून भाडेतत्त्वावर खोल्याही मिळतात. परराज्यातील नागरिकांना परस्पर खोल्या भाड्याने दिल्या जातात. यावर कायदेशीर बंधन आली पाहिजेत. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलली पाहिजे. शिर्डी आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे. येथील धार्मिक वातावरणात असे प्रकार घडणे धोकादायक असल्याने यावर तातडीने कारवाई होणे गरजेजे असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
गुन्हेगारीनंतर आता अंमली पदार्थ
शिर्डीमध्ये मध्यंतरी गुन्हेगारीच्या गंभीर घटना घडल्या. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी याची गांभिर्याने दखल घेत गुन्हेगारीवर अंकुश बसविण्यासाठी पोलिस प्रशासनासह शिर्डी संस्थान, नगरपंचायत यांना उपाययोजना करण्यास सांगितले. त्यानंतर गुन्हेगारी काहीशी कमी झाल्याचे दिसत असतानाच आता अंमली पदार्थाचा शिरकावचा गंभीर प्रकार पुढे येत आहे.
पोलिसांनी ड्रग्जची साखळी समूळ नष्ट करावी
शिर्डीसारख्या पवित्र भूमीत जर अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असतील, तर हे आमच्या मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. पोलिसांनी ड्रग्ज पेडलर्सवर तत्काळ धाडी टाकून ही साखळी समूळ नष्ट करण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह पालकांनी केली आहे.