
कुंभमेळ्याच्या नावाखाली सरकारचा मोठा भ्रष्टाचार, ३६ हजार कोटींच्या निधीत...; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
उत्तर महाराष्ट्र विभागातील लोकसभा प्रभारी, विधानसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी व जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितित पार पडली. यावेळी CWC सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार शोभा बच्छाव यांच्यासह आदी उपस्थित होते. नाशिकमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांचे एक शिबिर संपन्न झाले होते. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले होते, त्याच अजेंड्याचे पुनरावलोकन या बैठकीत करण्यात आले.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, समुद्रमंथनानंतर जेव्हा अमृताचा कुंभ निघाला, तेव्हा या कुंभातून अमृताचे थेंब पृथ्वीवरील ज्या चार ठिकाणी सांडले, त्यातील नाशिक हे एक ठिकाण आहे, या ठिकाणी दर १२ वर्षांनी कुंभमेळा होत असतो. पण देवेंद्र फडणवीस सरकार या कुंभमेळ्याच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे विष पेरत आहेत, या विषाची फळे त्यांना चाखावी लागतील. नाशिकमध्ये कोणतेही काम अद्याप पर्ण झालेली नाही, नाशिककर त्रस्त झाला आहे, बोगास वर्क ऑर्डर काढल्या जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचारासाठी एका मंत्र्याला नियुक्त केले आहे. भाजपा-महायुती सरकारने भ्रष्टाचारासाठी पवित्र असा कुंभमेळाही सोडला नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, भारतीय जनता पक्ष सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही स्तराला जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सत्तेसाठी जे केले तेच आता सहकार क्षेत्रातही करत आहेत. गोकुळच्या निवडणुकीत सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या पॅनलला स्पष्ट बहुमत असतानाही कोरमचा मुद्दा पुढे करत अध्यक्षाची निवड होऊ दिली नाही. ज्याचे बहुमत त्याचा अध्यक्ष निवडीचा अधिकार असतो. सरकारने कोरमचा नियम बदलला पाहिजे पण नवा कायदा करून ते आडमार्गाने गोकुळची सत्ता हस्तगत करत आहेत. सरकार नियुक्त ४ सदस्य नियुक्त करण्याचा अत्यंत चुकीचा प्रकार सरकारने सुरु केला आहे. हा कायदा संपूर्ण सहकार क्षेत्रातील संस्थांसाठी लागू होईल. भाजपा महायुती सरकार सहकार क्षेत्रच मोडीत काढण्यास निघाले आहे, या पापाचे धनी मुख्यमंत्र्यांनी होऊ नये असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
Ans: नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महायुती सरकारने ३६ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
Ans: मंडपासाठी २२ कोटी, हेलिपॅडसाठी ३ कोटी आणि सीसीटीव्ही यंत्रणेसाठी ३५० कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. विकासकामांच्या नावाखाली ५० टक्के मलई खाल्ली जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे.
Ans: भाजप-महायुती सरकार सहकार क्षेत्रातील संस्थांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीमध्ये कोरमचा मुद्दा उपस्थित करून बहुमत असलेल्या पॅनेलला डावलले जात असल्याची टीका त्यांनी केली.