कोल्हापुरात चोरट्यांचा हैदोस, एकाच रात्री 5 घरे फोडली; तब्बल लाखो रुपयांचा ऐवज चोरला
काेल्हापूर : वडणगे येथील राघोबा कॉलनी व साखरकर मळ्यातील छत्रपती कॉलनीत धुमाकूळ घालत चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री पाच घरे फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन घरांतील साडेपाच तोळे सोन्यांचे दागिने व रोख ५० हजार रुपये असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला आहे. चोरट्यांनी छत्रपती कॉलनीतीलही तीन घरे फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
बाजीराव हिंदुराव खोत (वय ६०, रा. मूळ वेखंडवाडी, ता. पन्हाळा, सध्या रा. वडणगे) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाजीराव खोत यांचा राघोबा कॉलनीत बंगला आहे. शनिवारी सकाळी ते कुटुंबीयांसह गावाकडे गेले होते. शनिवारी मध्यरात्री त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला व कपाटातील तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी तेथून जवळच राहणारे अभिजित सहदेव खुटाळे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील अडीच तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ५० हजार रुपये असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चार चोरटे कैद
चोरट्यांनी परिसरातील आणखी तीन घरांत चोरीचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी चोरीचा हा प्रकार लक्षात आला. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे, विजय तळसकर हे दाखल झाले. श्वानपथक मुख्य रस्त्यावर घुटमळले. एका रहिवाशी घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार चोरटे कैद झाले आहेत. यावरून येथे चोरट्यांची एक टोळी सक्रिय असावी, असा पोलसांना संशय आहे.