वाईत भरदिवसा चोरट्यांनी दोन घरे फाेडली; तब्बल 'इतक्या' लाखांची रोकड लंपास
वाई : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून लूटमार, घरफोडी, सोनसाखळी हिसकावणे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता वाई तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाईच्या गंगापुरीतील सृष्टी अपार्टमेंटमधील बंद सदनिका हेरून सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान चोरट्यांनी कुलुप तोडले, आत प्रवेश करुन कपाटातील सोने आणखी दिड लाख रुपये रोख घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तेथीलच आणखी एका फ्लॅटचे कुलूप तोडून तेथील कपाटात ठेवलेले १० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. दिवसाढवळ्या वाई शहरात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वाईच्या गंगापुरीत सृष्टी अपार्टमेंटमध्ये सदनिका क्र. ७ मध्ये विशाल धनाजी जरंडे पत्नी विनीता यांच्यासह राहतात. दोघेही शिक्षक आहेत. गुरुवारी (दि. १७) सकाळी नऊ वाजता सुमारास ते शाळेसाठी दरवाजाला कुलूप लावून निघून गेले. याचाच फायदा चोरट्यांनी घेऊन त्यांच्या घराच्या दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. कपाटाचे कुलुप तोडून त्यात ठेवलेले १३ लाख रुपये किंमतीचे १९ तोळे सोन्याचे दागिने व दिड लाख रुपये रोख रक्कम असा एकूण साडेचौदा लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले.
दरम्यान त्यानंतर समोरच्या एका सदनिकेच्या दरवाजाचे कुलूप तोडून तेथेही चोरट्यांनी आत प्रवेश करत कपाटात ठेवलेले १० हजार रुपये रोख घेऊन चोरटे पसार झाले. याबाबत विशाल धनाजी जरंडे (रा. आसरे, ता. वाई, सध्या रा. सृष्टी अपार्टमेंट गंगापुरी, वाई) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज पुढील तपास करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : कानाखाली मारल्याच्या राग अनावर; लोखंडी हत्याराने सपासप वार करून तरुणाला संपवल
तपासासाठी पोलिस पथके तैनात
या घटनेने गंगापुरीसह वाई शहरात दहशत पसरली आहे. वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. घडलेल्या प्रकारची बारकाईने पाहणी करून डिबी पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांनी चोरट्यांच्या तपासासाठी पोलिस ठाण्यातील पथके तैनात केली आहेत.
पुण्यातही भरदिवसा घरफोड्या
घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी कोंढवा आणि आंबेगाव पठार भागात भरदिवसा ३ फ्लॅट फोडून सुमारे ३ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. चोरट्यांनी बंद घरांची टेहळणी करून ही चोरी केल्याचा संशय आहे. दुपारी झालेल्या या घरफोड्यांमुळे पोलिसांची गस्त आणि प्रतिबंधात्मक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याप्रकरणी कोंढवा आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींचा तपास सुरू आहे.