पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; 'या' भागात बंद फ्लॅट फोडून लाखोंचा ऐवज चोरला
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नऱ्हे परिसरातील रुग्णालयाच्या सेवक वसाहतीत चोरट्यांनी घरफोडी करून २ लाख २२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार नऱ्हे येथील काशीबाई नवले रुग्णालयातील सेवक वसाहतीत राहायला आहेत. गुरुवारी (१३ फेब्रुवारी) सकाळी पावणेदहाच्या सुमारास सेवक वसाहतीत चोरटे शिरले. त्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तसेच, कपाटातील २ लाख २२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. तक्रारदार दुपारी दीडच्या सुमारास ते जेवण करण्यासाठी घरी आले. तेव्हा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. अधिक तपास उपनिरीक्षक अक्षय पाटील करत आहेत.
हे सुद्धा वाचा : धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; चुलत भावानेच रचला हत्येचा कट
रविवार पेठेतील वस्त्रदालनात चोरी
रविवार पेठेतील कापडगंज परिसरात मोठे कापड दुकान आहे. हे दुकान देखील चोरट्यांनी फोडून १ लाख ६८ हजारांची रोकड आणि लॅपटॉप असा १ लाख ८३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला आहे. याबाबत गोविंद राजाराम मुंदडा (वय ६५, रा. गंगाधाम, मार्केट यार्ड) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुंदडा यांचे कापडगंज परिसरात साडी विक्रीचे दुकान आहे. दुकान बंद असताना चोरट्यांनी दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्यातील रोकड आणि लॅपटॉप चोरुन पोबारा केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शिवराज हाळे करत आहेत.
पुण्यात पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह?
पुण्यातही सहा वर्षांपुर्वी सोनसाखळी चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. दिवसाला तीन ते चार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असत. पादचारी महिला तसेच ज्येष्ठ महिला या चोरट्यांच्या टार्गेटवर असत. तीन राज्यात या टोळ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. पुणे पोलिसांनी तीन राज्यातील माहिती एकत्रित करून या चोरट्यांचा माग सुरू केला होता. नंतर यातील काही टोळ्यांना पकडण्यात यश देखील आले होते. त्यांच्यावर मोक्कासारखी कारवाई देखील केली होती. नंतर या घटना थांबल्या होत्या. परंतु, आता पुन्हा सहा वर्षांनी सोन साखळी टोळ्या ॲक्टीव्ह झाल्याचे गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यामुळे पुन्हा तेच चोरटे ॲक्टीव्ह झाले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.