संग्रहित फोटो
पिंपरी :राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता चाकण येथे स्टीलच्या दुकानात येऊन मॅनेजरवर गोळीबार झाल्याच्या घटनेत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे. चुलत भावाने कौटुंबिक वाद आणि ईर्ष्येतून १२ लाखांची सुपारी देऊन चुलत भावावर हल्ला घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात एकूण पाच जणांचा सहभाग असून त्यातील दोघांना पोलिसांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे.
संग्राम उर्फ चंदन अनंत सिंग (वय ४२, रा. मारुंजी, पुणे), रोहित सुधन पांडे (वय २३, रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अजय विक्रम सिंग (वय ३५, रा. हिंजवडी, पुणे) असे जखमी मॅनेजरचे नाव आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जानेवारी रोजी महाळुंगे येथील कैलास स्टील कंपनीच्या आवारात मॅनेजर अजय सिंग यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात मॅनेजर अजय सिंग यांना दोन गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या गुन्ह्याचा समांतर तपास गुंडा विरोधी पथकाने केला. तांत्रिक विश्लेषणात अजय सिंग यांचा चुलत भाऊ संग्राम सिंग याच्यावर पोलिसांना संशय आला. मात्र त्याचा या गुन्ह्याशी संबंध नसेल असा विश्वास अजय सिंग व्यक्त करत होते. तरी देखील पोलिसांनी तपास सुरु ठेवला. संग्राम सिंग याच्यावर संशय बळावल्यानंतर त्याला मध्य प्रदेश मधील एका रेल्वे स्टेशनच्या बाहेरून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त (गुन्हे एक) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, सहायक फौजदार पी पी तापकीर, एस एन ठोकळ, व्ही एच जगदाळे, ए पी गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल जी डी चव्हाण, एस डी चौधरी, व्ही टी गंभीरे, जी एस मेदगे, एस पी बाबा, एन बी गेंगजे, व्ही डी तेलेवार, व्ही एन वेळापुरे, आर के मोहिते, एस टी कदम, टी ई शेख यांनी केली.