वाशिम शहरात चोरट्यांचा धुमाकूळ
पुणे : पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, धायरी तसेच सॅलिसबरी पार्क परिसरातील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी साडे सहा लाखांचा ऐवज चोरून पोबारा केला आहे. सॅलिसबरी पार्कमध्ये भरदिवसा अवघ्या दीड तासात चोरट्यांनी फ्लॅट फोडल्याचे समोर आले आहे. त्यासोबत लक्ष्मीरोडवरील लाँड्रीचे दुकान फोडत गल्यातील ७ हजारांची रोकड लांबवली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात ५७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार या सॅलिसबरी पार्क येथील किलबील शाळेसमोरील एका सोसायटीत राहण्यास आहेत. दरम्यान, त्या दोन दिवसांपुर्वी दुपारी दीडच्या सुमारास घराला कुलूप लावून गेल्या होत्या. तेव्हा अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे लॉक उचकटून आत प्रवेश केला. तसेच, कपाटातील ४ लाख ६२ हजार रुपयांचे दागिने चोरून पोबारा केला. तक्रारदार या दुपारी पावणे तीनच्या सुमारास परत आल्या असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. पुढील तपास उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे करत आहेत.
हे सुद्धा वाचा : सायबर पोलिसांची कामगिरी “सुमारच”; पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडचे सायबर पोलीस ‘सरस’..!
दुसरी घटना धायरी येथील बेनकर वस्तीत घडली असून, चोरट्यांनी १ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत ४९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार बेनकर वस्तीतील इमारतीत राहतात. ते १७ डिसेंबर रोजी घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे लॉक उचकटून आतील १ लाख ८१ हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला. तक्रारदार गुरूवारी (दि. १९ डिसेंबर) परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. तसेच लक्ष्मी रस्त्यावरील नाना पेठेतील लाँड्रीचे दुकान फोडण्यात आले असून, चोरट्यांनी ७ हजारांची रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांत ५० वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे.
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.