बंद घराचे कुलूप तोडून चार लाखांच्या दागिन्यांची चोरी;
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील कोथरूड आणि कात्रज या भागात घरफोडी करून 3 लाखांचा ऐवज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूडच्या शास्त्रीनगर तर कात्रजच्या राजस सोसायटीच्या आवारात या चोरीच्या घटना घडल्या आहेत
याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण व कुटुंबीय शास्त्रीनगर भागातील मराठा महासंघ सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री घराचे कुलूप तोडले. कपाटातील दोन लाख चार हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सोमवारी सकाळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. अधिक तपास सहायक निरीक्षक बालाजी सानप करत आहेत.
तसेच कात्रज भागातील राजस सोसायटी येथील बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत ४५ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. राजस सोसायटीत तक्रारदार महिला आणि कुटुंबीय बंगल्यात राहायला आहेत. चोरट्यांनी रविवारी सकाळी बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उचकटून ९० हजारांचे दागिने चोरुन नेले.
वस्त्र दालनात चोरी करणारा गजाआड
कल्याणीनगर भागातील वस्त्र दालनातून कपडे चोरून पसार झालेल्या चोरट्याला येरवडा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सात लाख ३० हजारांचे कपडे जप्त करण्यात आले. गणपत मांगीलाल डांगी (वय ४४, रा. विठ्ठलनगर, सिंहगड रस्ता) असे अटक केलेल्याचे नाव आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
कल्याणीनगर भागातील एस. एल. एंटरप्रायजेस या दालनातून टी-शर्ट, ट्रँक पँट, तसेच अंडरगारमेंटस असा आठ लाख रुपयांचा माल चोरून नेण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. आरोपी डांगी वस्त्र दालनात कामाला होता. त्याने वेळोवेळी कपडे चोरल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून सात लाख ३० हजारांचे कपडे जप्त करण्यात आले.