
धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले
बुलढाणा : जमिनीच्या वादातून जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि पुतण्याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या तिहेरी हत्याकांडानंतर आरोपी पसार झाला. ही घटना सोमठाणा (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथे गुरुवारी सायंकाळी ७वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस यंत्रणा आरोपीच्या मागावर आहे.
आई सरस्वती फतेसिंग सुरडकर (वय ७०), भाऊ संजय फत्तेसिंह सुरडकर (वय ५५) आणि पुतण्या रणजित संजय सुरडकर (वय २५) अशी मृतांची नावे आहेत. दीपक सुरडकर असे आरोपीचे नाव आहे. दीपककडे असणारी शेती त्याची आई सरस्वती हिने संजय याच्या नावावर केली. त्यातून खटके उडाले. नंतर राग अनावर होत धारदार चाकूने सर्वप्रथम आई सरस्वती, त्यानंतर भाऊ संजय आणि पुतण्या रणजित यांच्यावर सपासप वार केले. तिघांची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर आरोपी तेथून पसार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सोमठाणा ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून गावात भीतीचे आणि प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती तात्काळ चिखली पोलिसांना देण्यात आली.