
Maharashtra Breaking News Today 23.11.2026
23 Nov 2026 10:00 AM (IST)
मुंबईतील वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हाती घेतलेल्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पांतर्गत नाहूर-ऐरोली रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी तब्बल १ हजार ३५२ झाडे बाधित होणार असून, मुंबई महापालिकेच्या 'एस' वॉर्डकडून कापल्या जाणाऱ्या प्रत्येक झाडावर नोटीस लावण्यात आली आहे. या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पर्यावरणाची होणारी मोठी हानी लक्षात घेता, महापालिका प्रशासनाने संबंधित वृक्षतोडीचा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.
23 Nov 2026 09:55 AM (IST)
प्रवासात आणि दैनंदिन जीवनात शुद्ध पाण्याचा विश्वासार्ह पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या बिस्लेरी (Bisleri) कंपनीच्या पॅकबंद पाण्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पाण्यात कर्करोगाला कारणीभूत ठरणारे घटक आढळून आल्याने भारतीय खाद्य आणि सुरक्षा मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने बिस्लेरी कंपनीविरोधात न्यायालयात खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिस्लेरीच्या बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा नमुना प्राथमिक तपासणीत असुरक्षित आढळला होता. या पाण्यात 'ब्रोमेट' (Bromate) या संभाव्य कर्करोगकारक घटकाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे समोर आले होते. यानंतर कंपनीने केलेल्या अपीलनुसार हा नमुना रेफरल फूड लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला. मात्र, रेफरल लॅबच्या तपासणीतही पाण्यात पॉलीन्यूक्लियर अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) आढळून आले.
23 Nov 2026 09:50 AM (IST)
धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी यांच्याविषयी गोरक्षक संजय शर्मा यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी काल भाजपच्या वतीने शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी, सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे अस्वस्थ झालेल्या महापौर मायादेवी परदेशी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक दावा केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
Maharashtra to World Breaking News :
बाईक टॅक्सीला कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या मागणीसाठी आज मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नाशिकसह राज्यभरातील रिक्षा संघटनांनी एकदिवसीय राज्यव्यापी संपाची हाक दिली असून प्रवासी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील वाशी सेक्टर १८ येथे रात्री एका ऑईल कंपनीला लागलेल्या भीषण आगीत शेजारील प्लायवूड आणि कुरिअर कंपनी जळून खाक झाली.
राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील १.०६ लाख वैद्यकीय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ३८ कोटी रुपयांची घोषणा केली असून, राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या ‘स्मार्ट’ करण्याचा निर्णयही घेतला आहे नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह (Balendra Shah) आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंध आणि विकासात्मक मुद्यांवर चर्चा करणार आहेत.