
लाउंज बारमधील हाणामारीचे सत्र थांबेना! तुर्भेत तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेमुळे नवी मुंबईतील लाउंज बार आणि पबच्या परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज घरत हे आपल्या मित्रांसह आणि मैत्रिणीसोबत सोमवारी रोजी तुर्भे येथील ‘मित्रों लाउंज बार’मध्ये गेले होते. सकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास बारमधील लाउंजमध्ये नाचत असताना त्यांचा विकी गुप्ता, यश देशमुख आणि अंकुश केशरवाणी यांच्यासह असलेल्या काही जणांना धक्का लागला. याच किरकोळ कारणावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावेळी हा वाद शांत झाल्याचे वाटत असतानाच पार्किंग परिसरात पुन्हा वाद उफाळून आला.
अमरावतीत रुग्णालय परिसरात रक्तरंजित थरार! दारू पाजण्यास नकार दिल्याने रुग्णावर कोयत्याने हल्ला
फिर्यादी राज घरत हे बारच्या पार्किंगमध्ये आले असता विकी गुप्ता, यश देशमुख, अंकुश केशरवाणी आणि त्यांच्यासोबत असलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना घेरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाले. विकी गुप्ता याने राज घरत यांना पकडून त्यांच्या डोक्यावर, डाव्या कानाजवळ आणि उजव्या डोळ्याजवळ धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. तर यश देशमुख याने मयूर भगत यांना डोक्यात, बरगडीजवळ आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याशिवाय अंकुश केशरवाणी आणि त्याच्यासोबत असलेल्या इतरांनी नितेश पाटील, यश पाटील आणि याज्ञी भोईर यांनाही मारहाण केली. या हल्ल्यामुळे बारच्या परिसरात एकच गोंधळ उडाला.
नवी मुंबईमध्ये लाउंज बार, पब आणि मद्यविक्रीच्या ठिकाणी किरकोळ कारणांवरून वाद होऊन हाणामारीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. विशेषतः रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारास बारच्या बाहेर किंवा पार्किंगमध्ये अशा घटना घडत असल्याचे दिसून येते. नाचताना धक्का लागणे, खुर्चीवरून वाद होणे किंवा जुन्या भांडणाचा राग काढणे, अशा क्षुल्लक कारणांवरून थेट मारहाणीपर्यंत प्रकरणे पोहोचत आहेत. काही घटनांमध्ये धारदार शस्त्रांचा वापर होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.
बारमध्ये ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते; मात्र ग्राहकांच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था असते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बारच्या प्रवेशद्वारावर तसेच पार्किंग परिसरात पुरेसे सुरक्षारक्षक आहेत का? सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत का? ग्राहकांमध्ये वाद झाल्यास तो वेळीच रोखण्यासाठी व्यवस्थापनाकडून प्रयत्न केले जातात का? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ बारच्या आत सुरक्षा व्यवस्था ठेवून चालणार नाही, तर बाहेरील पार्किंग आणि परिसरातील सुरक्षेकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
घटनेची माहिती मिळताच तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसीम शेख आणि पोलीस उपनिरीक्षक वैभव नवले यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी राज घरत यांच्यावर वाशी येथील महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या तक्रारीवरून विकी गुप्ता, यश देशमुख, अंकुश केशरवाणी आणि इतर चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव नवले आणि तपास पथकाकडून सुरू आहे.
लाउंज बारमध्ये होणाऱ्या अशा घटनांमुळे नवी मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा बारच्या परिसरात नियमित गस्त वाढवावी, बार व्यवस्थापनाच्या सुरक्षाव्यवस्थेची तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Ans: नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील एका लाउंज बारमध्ये तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
Ans: नवी मुंबईतील लाउंज बार आणि बारमधील ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Ans: बारमधील वारंवार होणाऱ्या हाणामारी आणि हिंसक घटनांमुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे.